जपानप्रमाणेच भारतातही धावणार आगामी पाच वर्षात हायस्पीड ट्रेन

0

सरव्यवस्थापक डी.के.शर्मा ; भुसावळ रेल्वे विभागाची पाहणी, जंक्शनमध्ये जूनपर्यंत दोन नवीन प्लॅटफार्म

भुसावळ : भारतीय रेल्वेत प्रगत टेक्नॉलॉजी आज नसलीतरी आगामी पाच वर्षात जपानप्रमाणेच हायस्पीड रेल्वे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी दिली. भुसावळ विभागाचा शनिवारी दिवसभर त्यांनी दौरा केला. प्रसिद्धी माध्यमांनी संवाद साधताना ते म्हणाले की, भुसावळ रेल्वे स्थानकावर जूनअखेरपर्यंत स्वतंत्र दोन प्लॅटफार्मची उभारणी केली जात आहे शिवाय प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खान्देशची जीवनवाहिनी असलेल्या भुसावळ-सुरत पॅसेंजर अतिरीक्त दोन स्लीपर डबे जोडण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मकता दर्शवली तसेच भुसावळ-मुंबई स्वतंत्र एक्स्प्रेसबाबतही विचार करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. डीआरएम आर.के.यादव यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

मनमाड-नांदगाव दरम्यान हायस्पीडची चाचणी
जीएम स्पेशल ट्रेनने शनिवारी मनमाड ते नांदगाव या मार्गावर ताशी 122 वेगाने गाडी चालवत ट्रायल घेतली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सध्या रेल्वे ताशी 110 किलोमीटर वेगाने धावतात तर भविष्यात त्या 120 ते 130 किलोमीटर ताशी वेगाने चालवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

भुसावळ विभागातील अनेक स्थानकांची पाहणी
महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी नांदगाव स्थानकावरील गार्ड व ड्रायव्हर लॉबीची पाहणी केली तसेच पिंपरखेड सबस्टेशनला भेट देत हिरापूर रेल्वे स्थानकाचे इन्स्पेक्शन केले. चाळीसगाव वेल्डींग वर्क्सशॉपची पाहणी तसेच पाचोर्‍यातील रेल्वे कॉलनीसह नगरदेवळा ब्रिजची पाहणी करण्यात आली. सुविधांनी ते भारावल्याचे पीआरओ म्हणाले.

रेल्वे स्थानकाची बारकाईने पाहणी
शनिवारी सायंकाळी 5.20 वाजता जीएम स्पेशल ट्रेन प्लॅटफार्म क्रमांक आठवर आली. याप्रसंगी प्लॅटफार्म क्रमांक सहावरील वॉटर वेंडिग मशीनचे त्यांनी उद्घाटन केले तसेच प्लॅटफार्म क्रमांक चारवरील टीटी लॉबीचे उद्घाटन करण्यात आले. प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील अजिंठा पेग्िंटगजी त्यांनी पाहणी केली. ऑईल डेपोजवळील गांडूळ खत प्रकल्पाची, बसस्थानकात उभारलेल्या संरक्षक भिंतीची तसेच आगामी काळात रेल्वेच्या मोकळ्या जागेवर विकसीत होणार्‍या जागेची पाहणी त्यांनी केली.

रेल्वे सुरक्षा बलाला मिळाल्या नवीन बुलेट
भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाला 17 नवीन बुलेट मिळाल्याने त्या शर्मा यांच्या उपस्थितीत जवानांना देण्यात आल्या. तत्पूर्वी हिरवी झेंडी त्यांनी जवानांना दाखवली. प्रसंगी त्यांना रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक व्ही.के.लांजीवार व जवानांनी मानवंदना दिली. ‘अ’ श्रेणी स्थानकांवर आता ‘स्टेशन डायरेक्टर’ पोस्ट भरली जाणार असून त्यांना डीआरएम प्रमाणेच जादा अधिकार दिले जातील त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या तत्काळ निकाली निघतील, असे शर्मा म्हणाले.