जप्त मिळकतींचा महापालिका करणार लिलाव

0

जळगाव । मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी चारही प्रभागातुन जवळपास 1 हजार मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मिळकतींचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. मालमत्ताकराची थकबाकी वसुल करण्यासाठी मनपा प्रशासनाने मोहीम राबविली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मिळकतधारकांकडे थकबाकी आहे. अशा 1 हजार मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जप्त केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

33 कोटीची झाली वसुली
मालमत्ताकरापोटी 2017-18 मध्ये 43 कोटीची मागणी होती. त्यापैकी 33 कोटीची वसुली करण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून 28 कोटीची थकबाकी आहे. त्यापैकी 12 कोटीची वसुली झाली असल्याची माहिती प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. मालमत्ताकराची संगणकीकृत बिलं मालमत्ता मुल्यांकनासाठी अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सीकडून ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रभागनिहाय डाटा एन्ट्रीचे काम सुरु असून मालमत्ताकराची संगणकीकृत बिले वितरीत करण्यात येणार आहे. यावर्षीपासून पाणीपट्टी आणि मालमत्ता एकत्रित बिलं देण्यात येणार आहे.