जमिनीचा मोबदला देण्यास लोकप्रतिनिधींनी घेतली राज्याच्या उद्योग मंत्र्यांची भेट

0

भूसंपादन करून मोबदला वाटप लवकरच सुरु होईल

उद्योगमंत्री देसाई यांचे आश्‍वासन

चाकण : चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचसाठीच्या भूसंपादनास तयार झालेल्या शेतकर्‍यांनी अनेकदा मागणी करूनही प्रत्यक्षात त्यांना जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे या भागाच्या लोकप्रतिनिधींनी राज्याच्या उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन भूसंपादनास तयार असलेल्या शेतकर्‍यांना मोबदल्याचे वाटप करण्याचे साकडे घातले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही लवकरात लवकर मोबदला वाटप सुरु करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचसाठीच्या भूसंपादनाचे प्रशाकीय दिरंगाईत रुतलेले चाक बाहेर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चाकण येथील टप्पा क्रमांक पाचमध्ये मौजे चाकण, रोहकल, आंबेठाण, वाकी खु., गोणवडी तसेच बिरडवडी या गावातील जमिनींचे संपादन करण्यासाठी सर्व गावातील जमिनींवर शिक्के मारले आहेत.

गेल्यावर्षी ठरविले मुल्यांकन दर

शासनाने महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 कलम 32 (2) प्रमाणे कार्यवाही सुरु करून कलम 32 (1) प्रमाणे अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर 6 जुलै 2017 आणि 4 ऑगस्ट 2017 रोजी बैठका घेऊन मूल्यांकन दर ठरविण्यात आले. 21 मे 2018 रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या 93 व्या बैठकीत चाकण, गोणवडी आणि वाकी खुर्द येथील क्षेत्रासाठी 1 कोटी 62 लाख 50 हजार रुपये प्रति हेक्टर (65 लाख प्रति एकर) तसेच रोहकल, आंबेठाण आणि बिरडवडी येथील क्षेत्राकरिता 1 कोटी 37 लाख 50 हजार प्रति हेक्टर (55 लाख रुपये प्रति एकर) अशा दरास मंजुरी देण्यात आली. निवाडा करताना किमान 50 हेक्टर संपादनास संमती आवश्यक असल्याचीही अट यामधे टाकण्यात आली. त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी 24 जुलै 2018 पासून जमीन संपादनास मान्यता देऊन जवळपास 273 हेक्टर क्षेत्राला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु शेतकर्‍यांनी मान्यता देऊनही अद्यापपर्यंत भूसंपादनाची आणि मोबदला देण्याची कुठलीही कार्यवाही शासन स्तरावरून झाली नाही.

मोबदला देण्याची केली मागणी

लवकरात लवकर मोबदला वाटप सुरु करा अथवा संपादन करणार नसेल तर जमिनींवरील शिक्के काढून टाकावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती. त्यानुषंगाने सोमवारी (दि.19) खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेवून चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. पाचचे भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरु करून ज्या शेतकर्‍यांना जमिनी द्यायच्या आहेत त्या शेतकर्‍यांना मोबदल्याचे वाटप सुरु करावे अशी मागणी केली. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री देसाई यांनी लवकरात लवकर मोबदला वाटप सुरु करण्यात येईल असे आश्‍वासन यावेळी दिले.

शेतकर्‍यांकडून सातत्याने पाठपुरावा

चाकण एमआयडीसी टप्पा पाचसाठी संमतीने जमीन देण्यास तयार असलेल्या शेतकर्‍यांनी स्वखुशीने हमीपत्र दिली आहेत. प्रशासनाला अनेकदा विनंती करूनही जमिनीचा मोबदला देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरु न झाल्याने अखेरीस मागील महिन्यात (15 ऑक्टोबर) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वाकडेवाडी ( पुणे) येथील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला होता. भूसंपादनाचे शेरे काढून सातबारा कोरा करा, किंवा मोबदला द्या अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली होती. चाकण एमआयडीसीमध्ये मागील आठवड्यात आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबतचे निवेदन दिले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही शेतकर्‍यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.