मुंबई | ठाणे शहरात रतनशी प्रेमजी चॅरिटी ट्रस्टच्या जमिनीच्या विक्रीबाबत अनियमितता झाली असल्यास विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून चौकशीअंती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
ठाणे शहरात रतनशी प्रेमजी चॅरिटी ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन विक्रीसंदर्भात सदस्य संजय केळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. राठोड म्हणाले, सदर जमिनीमधील शेकडो एकर जमिनीची ट्रस्टने धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता विकासकांना विक्री केली आहे का याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. विक्रीची परवानगी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी, बनावट पावत्या, कोट्यवधींचा अपहार, स्टॅम्प ड्युटी यासंदर्भात सर्व बाबींची चौकशी करून, चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.