जम्मू-काश्मिरात भाजप सचिव आणि त्यांच्या भावाची हत्या !

0

श्रीनगर-जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भाजपाचे राज्य सचिव अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ हे त्यांच्या दुकानातून परतत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर किश्तवाडमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. ज्या हल्लेखोरांनी अनिल परिहार आणि त्यांच्या भावावर पाळत ठेवले होते. हल्लेखोरांनी अनिल परिहार आणि त्यांचा भाऊ परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या दोघांनाही तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केले.

भाजपाचे नेते अशोक कौल यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. परिहार यांचा भाऊ सरकारी कर्मचारी होता. हे दोघे तपन गल्ली भागात आले तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सुरक्षा रक्षक असूनही या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. हा हल्ला दहशतवाद्यांनी केला आहे का? याचा शोध सुरु आहे. तसेच हल्ला झाला तेव्हा परिहार यांचे सुरक्षा रक्षक कुठे होते याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.

अनिल परिहार आणि त्यांच्या भावाच्या हत्येचे वृत्त धक्कादायक आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत..