सोपोर: जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये आज शनिवारी चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. सोपोरच्या हाथलांगू येथे झालेल्या चकमकीनंतर हा परिसर रिकामी करण्यात आला. येथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी देखील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आले होते. सकाळी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा समावेश होता.
सर्च ऑपरेशनदरम्यान सोपोरच्या या हाथलांगू गावात लपून बसलेल्या दहशतवाद्याने सुरक्षा रक्षकांवर गोळी झाडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शोधमोहीत वाढवण्यात आली तशी या लपलेल्या दहशतवाद्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाने प्रत्युत्तर केलं. गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बंद केले आणि या दहशतवाद्याला ठार केलं.’
हा दहशतवादी कोणत्या संघटनेचा आहे, त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. तो जिथे लपला होता, तेथून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. सोपोर आणि अवंतीपोरा भागातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच श्रीनगर आणि जम्मू क्षेत्रातली ट्रेन सेवाही स्थगित करण्यात आली आहे.