जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका!

0

महबूबा मुफ्तींचे मोदी आणि पाकिस्तानला आवाहन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी सीमारेषेवरील तणाव निवळण्यासाठी भावूक आवाहन केले आहे. सीमारेषेवर रक्ताची होळी खेळली जात आहे. कृपया जम्मू-काश्मीरला युद्घाचा आखाडा बनवू नका, असे आवाहन महबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला केले.

महबुबा मुफ्ती रविवारी पोलिसांच्या पासिंग आऊट परेडला उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, आमच्या सरहद्दीवर एक प्रकारची रक्ताची होळी खेळली जात आहे. पंतप्रधान एकीकडे म्हणतात की देशाने विकासाच्या रस्त्यावर चालले पाहिजे. पण दुसरीकडे आमच्या राज्यात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला विनंती करते की, जम्मू-काश्मीरला आखाडा बनवू नका. दोन्ही देशांमध्ये मैत्रिचा सेतू बांधा. गुरुवारपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बीएसएफ आणि लष्कराच्या 5 जवानांचाही समावेश आहे.