जम्मू-काश्मीरातील त्रालमध्ये चकमकीत ६ दहशतवादी ठार

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरातील त्रालमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले. अवंतीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने हा परिसर खाली केला व त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर देत या झालेल्या चकमकीत दहशतवादी झाकिर मुसा संघटनेचे सहा दहशतवादी ठार झाले.

त्रालमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले असून या चकमकीत कुख्यात दहशतवादी झाकिर मुसाच्या संघटनेचा उपाध्यक्ष सोलिहा याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. झाकिर मुसा हा ‘अल कायदा’ची नवीन संघटना ‘अन्सार गजवत-उल-हिंद’चा म्होरक्या आहे. सहा दहशतवादी ठार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक पदार्थ सुरक्षा दलाला मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत मोस्ट वाँटेड जहूर अहमद ठोकर याचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी तो जुलैमध्ये सेनेच्या कॅम्पमधून फरार होवून दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.