जम्मू-श्रीनगर हायवेवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; रेड अलर्ट जारी

0

श्रीनगर – जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान दहशतवादी जम्मू-श्रीनगर हायवेवर बॉम्ब हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी सकाळी 9 च्या आधीपासून या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी तपासणीचे आदेश दिले आहेत.

जोपर्यंत गुप्तचर यंत्रणेकडून कोणताही पुढील आदेश येत नाही तोवर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मोटारसायकल हायवेवर येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. आज रविवार सुट्टी असल्याकारणाने सुरक्षा यंत्रणांकडून हायवेवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीनगरच्या बटवारा परिसर हा अतिसंवेदनशील असल्याने याठिकाणी बॉम्बब्लास्ट केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या परिसराशिवाय दहशतवादी हायवेवर कुठेही दहशतवादी कृत्य करु शकतो. यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत.

गेल्या दोन महिन्यांमध्ये हायवेवर दोनवेळा सुरक्षा यंत्रणांच्या ताफ्याला दहशतवाद्यांनी लक्ष केलं आहे. पुलवामा हल्ल्यांमध्येही दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष करण्यात आले होते. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा बनिहालजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर कारने टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कारमध्ये झालेल्या बॉम्बब्लास्टमध्ये सीआरपीएफच्या बसचं नुकसान झाले होते.