शिमला : सलग पाचवेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ठाकूर हे हिमाचलचे 13 वे मुख्यमंत्री असतील. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला. यामुळे आता मुख्यमंत्री कोण? असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता. त्यावर रविवारी तोडगा काढण्यात आला. येत्या 27 डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी
रविवारी भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत धुमल यांनी जयराम ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ठाकूर यांच्या नावाला जे. पी. नड्डांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि हिमाचलमध्ये ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जयराम ठाकूर आदी नेते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. ठाकूर हे सेरज विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. 2007 ते 2009 या कालावधीत ते भाजपचे हिमाचलचे प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असल्याने ठाकूर यांचे पारडे जड होते.
जे. पी. नड्डांच्या नावाचा विचार
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना या पदावर आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्यासाठी पुन्हा पोटनिवडणुकीचे सोपस्कार करावे लागले असते. ते टाळून विद्यमान आमदारांमधून मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर ठाकूर यांच्या नावावर एकमत झाले आहे.