चेन्नई-बेंगळुरूत राहणाऱ्या अमृता नामक महिलेने ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री स्व.जयललिता यांची मुलगी असल्याचा दावा करत न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेले होते. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान स्व.जयललिता या कधीही गर्भवती नव्हत्या, त्यांना अपत्य नव्हते असा दावा तामिळनाडू सरकारने मद्रास हायकोर्टात केला आहे. सरकारच्यावतीने १९८० मधील व्हिडिओ क्लिप्स कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या आहेत. सरकारच्या वतीने अॅडव्होकेट जनरल विजय नारायण यांनी हायकोर्टात बाजू मांडली.
नारायण यांनी अमृता यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली. अमृता यांना जयललिता यांची संपत्ती हवी आहे, असे नारायण यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले. अमृता यांनी कधीही जयललिता यांच्या सोबत छायाचित्र का नाही काढले. अमृता यांच्या दाव्यानुसार त्यांचा जन्म ऑगस्ट १९८० मध्ये झाला. पण याच कालावधीत जयललिता एका चित्रपट सोहळ्यात उपस्थित होत्या. त्या सोहळ्यातील व्हिडिओमध्ये जयललिता या गर्भवती होत्या असे कुठेही दिसत नाही, असे त्यांनी कोर्टात सांगितले. नारायण यांनी त्या व्हिडिओ क्लिप्स कोर्टात सादर केल्या. हा चित्रपट सोहळा अमृता यांच्या जन्माच्या एक महिन्यानंतर झाला होता.
जयललिता यांच्या नातेवाईकांचे डीएनएचे नमुनेही घेता येतील आणि यातून सत्य बाहेर येईल, असेही नारायण यांनी नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.