दिवाळीनिमित्त राबवला उपक्रम; जय गणेश फाउंडेशनचे सहकार्य
भुसावळ- शहरातील जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघातर्फे शनिवारी दोन विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या. जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मातोश्री द्वारकाई कालिदास नेमाडे यांचे स्मरण करण्यासाठी या उपक्रमात आर्थिक योगदान दिले. सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभेत हा उपक्रम राबवण्यात आला. अध्यक्ष डी.डी.जावळे, सचिव सुनंदा औंधकर, समन्वयक अरुण मांडळकर, कोषाध्यक्ष एस.आर.पाटील, एस.के.पाटील, विलास चौधरी, नगरसेवक किरण कोलते यांच्या हस्ते गणेश महिरे व मीरा मोरे या दोघा विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली.
सामाजिक भावनेतून उमेश नेमाडेंचा उपक्रम
समाजाचेही आपण काही देणं लागतो या भावनेतून जय गणेश फाउंडेशन काम करीत आहे. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे हे त्यांच्या मातोश्री स्व.द्वारकाई यांच्या आठवणींचे स्मरण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. गेल्या चार वर्षात 12 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. समाजातील उपेक्षित घटकांतील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपला थोडासा हातभार लागावा हाच त्यांचा उद्देश आहे. याच समर्पित भावनेने ते ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हा उपक्रम राबवतात, अशी माहिती समन्वयक अरुण मांडळकर यांनी या उपक्रमात दिली. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयात जाण्यासाठी सायकलींची भेट मिळाल्याने दोघा विद्यार्थ्यांना भावना व्यक्त करताना गहिवरून आले होते.
चेहर्यावर उमटले समाधानाचे भाव
सण, उत्सवात ‘जॉय ऑफ गिव्हींग’चा जो आंनद मिळतो ता शब्दातीत असतो. समाजाची गरज ओळखून दात्यांच्या सहकार्याने मदत करण्याचा प्रयत्न जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघ करीत आहे. सायकलींची किल्ली स्वीकारल्यानंतर दोघा विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर जे समाधानाचे भाव उमटले ते आयुष्याची संध्याकाळ हिरवीगार करण्यासाठी निश्चितच पुरेसे ठरतील, अशा भावभावना अध्यक्ष डी.डी. जावळे व सचिव सुनंदा औंधकर यांनी व्यक्त केल्या. 1