‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात अभिवादन

0

धुळे । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शहरासह जिल्ह्यात तरुणाईचा उत्साह गावा-गावात आणि शहरातील रस्त्यांवर ओसंडून वाहतांना दिसत होता. माथ्यावर भगवा फेटा बांधून युवक आणि युवती पारंपारीक पेहरावात हातात भगवा झेंडा घेवून तो डौलाने आसमंतात फडकवतांना ताल धरत होते.जय भवानी.. जय शिवाजीच्या जयघोषाने जोशपुर्ण अशा वातावरणात संपूर्ण धुळे नगरी दुमदुमली होती. चौकाचौकात, रस्तोरस्ती भगवे झेंडे फडकवणार्‍या युवकांच्या गर्दीने संपूर्ण मार्ग व्यापले गेले होते. यामुळे शहरात भगवी लाट उसळल्याचे नयनरम्य दृष्य धुळेकरांना सुखावत होते.

धुळे शहरात रात्री बारा वाजेपासूनच युवकांचे जथ्थेच्या जथ्थे मोटरसायकलने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येवून छत्रपतींना अभिवादन, वंदन करीत होते. शहरातील अनेक भागांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमांच्या पुजनाचे कार्यक्रम साजरे होत होते. शिव पुतळ्यांचा परिसर सुशोभित करुन त्या ठिकाणी ध्वनीक्षेपकावरुन सादर होणारे पोवाडे विरश्री निर्माण करीत होते. पहाटेपासूनच शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची लगबग सुरु होती. तर त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी मोटारसायकल रॅली काढून अभिवादनाचे कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे, यात महिला आणि बालकही मागे नव्हते. महिलांनी मोटारसायकल रॅली तर लहानग्यांनी सायकल रॅली काढून आम्हीही छत्रपती शिवरायांचे मावळे असल्याचे दाखवून दिले.

हायड्रॉलिक रॅम्पची व्यवस्था
शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्ताने शहरात घेण्यात आलेल्या विविध कार्यकमांनी तरुणांसह अबाल वृध्दांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. शहरातील मनोहर टॉकीज परिसर, पारोळारोडवरील गिंदोडिया चौक, साक्रीरोडवरील शिवतिर्थ तसेच जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील देवपूरातील एसएसव्हीपीएस कॉलेज या ठिकाणी शिवरायांना अभिवादन -किरण्यासाठी गर्दी उसळली होती. शिवतिर्थावर छत्रपतींच्या गळ्यापर्यंत पोहचता यावे म्हणून हायड्रोलिक रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. एकावेळी 10च्या संख्येने शिवभक्त शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी जात असल्याने शिवतिर्थावरील गर्दी लक्ष वेधून घेत होती. मनोहर टॉकीज परिसरातील छत्रपती शिवरायांच्या नव्याने साकारलेल्या स्मारकावरही शिवप्रेमींची गर्दी उसळली होती. मराठा युवक मंडळासह महिला मंडळांने छत्रपतींना अभिवादन केले. तर युवक मंडळाची मोटारसायकल रॅली अभिवादनानंतर शहर परिक्रमेला निघाली.

कोंडाजी विजय व्यायामशाळेतर्फे दुग्धाभिषेक
शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीनेही छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले,सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, भुपेंद्र लहामगे, राजु पाटील, धिरज पाटील, पंकज गोरे, डॉ.सुशिल महाजन, प्रविण अग्रवाल, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, मनपाविरोधी पक्षनेते वैशाली लहामगे आदी उपस्थित होत्या. ग.नं.6 मधील कोंडाजी विजय व्यायाम शाळेतर्फेही छत्रपतींच्या अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिलीप गांगुर्डे, तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्ता पवार, भगवान कालेवार, भरत ताथेड, पत्रकार मिलींद बैसाणे, यशवंत हरणे, चंद्रशेखर पाटील, सुनिल पाटील, ओम शर्मा आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

दिगंबर विजय व्यायामशाळेची दिंडी
ग.नं.5 मधील दिगंबर विजय व्यायाम शाळेने दिंडी काढली. या शिस्तबध्द मावळ्यांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. तर ग.नं.5 मधील आई तुळजाभवानी ग्रुपच्या लहान मुलांनी सायकल रॅली काढली. मराठा समाजातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी संदीप सुर्यवंशी,संजय वाल्हे,सुनिल आगलावे आदी उपस्थित होते. तर महिला आघाडीतर्फे जयश्री काळे, वृषाली गिरमकर, माया बहादुर्गे, भारती चिद्रे, योगिनी शेळके, सुदर्शनी गिरमकर आदी उपस्थित होत्या.

शिरपूर येथे शिवदौड मॅरेथॉन
शिरपूर । येथील मराठा व्यापारी संघटना व सकल मराठा समाज यांच्यातर्फे शिवजंतीनिमित्त आज आयोजित शिवदौड मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक येथील दिनकर गुलाब महाले याने विजेतेपद पटकावले. दोंडाईचा येथील भगतसिंग रामसिंग वळवी हा उपविजेता ठरला. रवी भिलाल गवळी याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात रंजिता किसन पाडवी (धडगाव) हिने प्रथम, अश्‍विनी नामदेव काटोले (जळगाव) हिने व्दितीय तर चेतना विलास पटेल (शिरपूर) हिने तृतीय क्रमांक मिळवला. येथील चोपडा जीनच्या मैदानावर आज सकाळी उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार महेश शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, निरीक्षक संजय सानफ यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी गजानन पाटील याने शिवचरित्राची महती सांगितली. आर.सी. पटेल विद्यालयाचा विद्यार्थी रोनक जैन याने शिवरायांचा पोवाडा सादर केला. यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. चोपडा जीन येथून सकाळी साडेसातला जिजाऊंच्या पोशाखातील बालिकांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून मॅरॅथॉनला सुरवात झाली.

बोराडी येथे व्याख्यानाचे आयोजन
बोराडी येथील कर्मवीर नगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी एच.जी.निंबाळकर होते.यावेळी ताराचंद निंबाळकर,डॉ.जी.एच.पाटील,अशोक पवार,कांतीलाल देवरे,संजय बागुल, विजय सोनवणे,अंबादास सगरे,लक्ष्मण गोपाळ,अनिल बडगुजर,निशांत पाटील,विजय पवार,दिलीप ठाकुर,सतिश ईशी,संजय पवार, टी.टी.ढोले,विशाल पावरा, नाजिम शेख,नरेंद्र बाविस्कर,हिंमत पवार,आनंदा चौधरी,चंद्रशेखर सोनवणे,पंकज पाटील,अरविंद भामरे,योगेश सगरे,किशोर आलोणे,जितेंद्र पावरा,सुनील सामुद्रे,गणेश पटेल,सुनील बडगुजर,मयुरेश भामरे आदी उपस्थित होते.