जय महाराष्ट्र चालणार नाही!

0

बेळगाव : ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली पहिली बस बेळगावात दाखल झाली आणि ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देऊन बसचे स्वागत करण्यात आले. परंतु, ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह एसटीचे ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सूरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा मार्केट पोलिसांनी दाखल केला आहे. 143, 147 आणि 153 अ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचे जंगी स्वागत केले. तसेच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत करण्यात आले. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा कायदा करण्याची धमकी दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक एसटी बसवर जय महाराष्ट्रात लिहिण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी मुंबईहून निघालेली मुंबई-बेळगाव बस रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोहोचली. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टरला फेटा बांधून प्रवाशांना पेढे वाटले आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यासह एसटी चालक, कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या एसटीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरही राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने कर्नाटकातील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.