मुंबई । ठाण्याच्या जय शिव आणि न्यू उत्कर्ष या संघांनी आपापल्या गटात दुसर्या विजयानिशी स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्य स्तरीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जय शिवने यंग प्रभादेवीचा 33-19 असा पराभव केला.जय शिव या ठाण्याच्या संघाकडून वृषभ कुलकर्णी, अनिकेत चिकणे यांनी जोरदार चढाया केल्या तर शुभम सिंघच्या पकडीची साथ त्यांना मिळाली. सांगलीकरांनी उपनगरच्या स्वस्तिकचा 34-29 आणि शहरच्या ओम ज्ञानदीपचा 44-31 असा पराभव करून आगेकूच केली. राजाभाऊ देसाई स्मृती चषकासाठी खेळविल्या जाणार्या या स्पर्धेत जय शिव-स्वस्तिक (उपनगर), संघर्ष (उपनगर) – उत्कर्ष (पुणे), वाघजाई (रत्नागिरी)- गोल्फादेवी (शहर) आणि पिंपळेश्वर (शहर) – न्यू उत्कर्ष अशा आता लढती होतील.
न्यू उत्कर्षने स्वस्तीकवर विजय मिळविताना मध्यंतराला 16-9 अशी आघाडी घेताना लोन चढविला. प्रशांत बनसोडे आणि महेंद्र कर्णिकार यांनी भेदक चढाया केल्या. त्यांना उत्तरार्धात चोख उत्तर देण्यात स्वस्तीकला यश आले. त्यांनी सुरज मोरे, तनिष देशमुख यांच्या चढाया आणि सिद्धेश पांचाळ, अलंकार पाटील यांच्या पकडीच्या बळावर बाजी उलटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सागर थोरात, अनिल पालखे यांनी सांगली संघाला सावरले. ज्यामुळे त्यांनाही लोन चढविण्यात यश आले. रत्नागिरीच्या वाघजाई संघाने आपली छाप पाडताना दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना सहज लोळविले. त्यांनी संघर्षचा 60-27 आणि सिद्धी प्रभाचा 51-22 असा पराभव केला. या विजयामध्ये त्यांचे शुभम शिंदे अजिंक्य पवार, साईराज कुंभार आणि ओमकार कुंभार यांनी महत्वाची भूमीला बजावली. अष्टपैलू शुभम शिंदेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले तर पहिल्या दिवसाचा उत्तम खेळाडू हा बहुमान पिंपळेश्वारच्या सोहम बेलोसे याला प्राप्त झाला.
साखळीतील अन्य निकाल : श्रीराम (पालघर) वि.वि. गोल्फादेवी 44-37, पिंपळेश्वर वि.वि. यंग प्रभादेवी 39-16; उत्कर्ष (पुणे) वि.वि, श्रीराम (पालघर) 43-28; गोल्फादेवी वि.वि. उत्कर्ष (पुणे) 52-45.