आमदार हरीभाऊ जावळे यांच्यासह संत-महंतांचा पुढाकार ; 2 रोजी शुभारंभ
फैजपूर- रावेर-यावल तालुक्यातील दिवसेंदिवस पाणीपातळी खोलवर जात असल्याने ही चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलक्रांती या अभियानाची सुरुवात 2 मे पासून होणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुमन माधव फाउंडेशनचे प्रमुख आमदार हरीभाऊ जावळे व उपस्थित संत-महंत तसेच राज्याचे माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांनी केले. वढोदा येथील निष्कलंकी धाममध्ये पत्रकार परीषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी प्रस्तावना करताना आमदार हरीभाऊ जावळे यांनी या अभियानाउमागील पार्श्वभूमी विषद केली.
जलक्रांती अभियानातून सुटेल समस्या -मान्यवरांचा सूर
आज अनेक शेतकर्यांना पाण्याअभावी केळी उपटून फेकावी लागत आहे तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचीही समस्या उद्भवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. याच पार्श्वभूमीवर या जलक्रांती अभियानाची सुरुवात होणार आहे. या वेळी माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांनी या अभियानातील तांत्रिक बाबी व लोकसहभाग व संघटीत प्रयत्न याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. येणारे पाणी संकट व त्याला कशा प्रकारे तोंड द्यावे यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी जिल्हा परीषदेमार्फत जे काही सहकार्य करता येईल, ते करू असे आश्वासन दिले. स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाश यांनी या अभियानासाठीचे आधी नियोजन करावे त्यानुसार समाधानासाठी तरुणांची फौज उभी करू व त्यासाठी गावोगावी जाऊन मार्गदर्शन करू, अशी माहिती दिली. महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराजांनी पाणी समस्या भीषण होत असताना पाण्याचा विपर्यास थांबवा पाण्याचा थेंब-थेंब घडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. गोपाल चैतन्य महाराज यांनी मार्गदर्शन केले.
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
महामंडलेश्वर जनार्दन महाराज, स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष भक्ती प्रकाशदासजी महाराज, उपाध्यक्ष भक्ती किशोरदासजी महाराज, पाल येथील गोपालचैतन्यजी महाराज, आमदार हरीभाऊ जावळे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता तथा माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, कृषिभूषण नारायण चौधरी, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनील कोंडे, उद्योजक तथा दत्त ठिबकचे संचालक जितेंद्र पवार, माजी कृ.उ.बा सभापती हिरालाल चौधरी, डॉ.एस.डी.चौधरी, डॉ.भरत महाजन, प्रा.के.जी.पाटील, डॉ.सुरेश पाटील, न्हावी सरपंच नितीन चौधरी यांच्या सह परीसरातील नागरीक उपस्थित होते.