जलपर्णीमुळे ‘भीमा’ हिरवीगार!

0

राजगुरुनगर । भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाल्याने पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे. या पाण्याला वास येत असल्याने हे पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी अयोग्य आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.भीमा नदीवर राजगुरूनगर जवळील कोल्हापूर बंधार्‍यात मागील महिन्यात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसानंतर येथे जलपर्णी वाढीस लागली. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीचे पात्र हिरवेगार झाले आहे. जलपर्णीमुळे मासेमारी व्यवसायाला खीळ बसला आहे. खरपुडी खुर्द येथील बंधार्‍यात देखील पाणी दुषीत झाले आहे.

नदी स्वच्छ करण्याची मागणी
या पाण्यांवर हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. परंतु पाणी दुषीत, सांडपाणी नदीच्या स्वच्छ पाण्यात मिसळल्याने पाणी अस्वच्छ होऊन जलपर्णी फोफावली आहे. जलसंपदा विभागाने तात्काळ कायम स्वरुपी जलपर्णीचा बंदोबस्त करण्याची मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती दशरथ गाडे, खरपुडी खुर्दचे सरपंच अनिता गाडे, मांजरेवाडी सरपंच अनिता मांजरे, निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे, दावडीचे माजी सरपंच सुरेश डुंबरे, उपसरपंच संतोष गव्हाणे यांनी केली आहे.