जलपातळी घटली ; केळी धोक्यात

0

जलसंकट ; विहिरींसह कुपनलिका आटल्या ; केळी उत्पादक संकटात

भुसावळ- केळीचा बेल्ट म्हणून ओळख असलेल्या रावेरसह यावल, मुक्ताईनगर तालुक्यात केळी पीक संकटात सापडले आहे. विहिरींनी गाठलेला तळ, कुपनलिका आटलेल्या त्यातच वाढत्या उन्हाच्या तडाख्यात केळी घड निसटत असतानाच पाण्याअभावी हिरव्यागार बागा सुकल्याने केळी उत्पादक संकटात सापडला आहे. तीनही तालुक्यात 23 हजार हेक्टरवरील केळीचे आतापर्यंत नुकसान झाले आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडणार्‍या बळीराजाला आता माय-बाप सरकारकडून मदतीची आस आहे.

केळीच्या प्रांतात दुष्काळाच्या झळा
मुक्ताईनगर तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरावर केळीची लागवड झाली असलीतरी वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे तीन हजार हेक्टरवरील केळी धोक्यात सापडली आहे तर यावल तालुक्याचा विचार केल्यास नऊ हजार पैकी साडेचार हेक्टरवरील केळीला वाचवण्यासाठी केळी उत्पादकांची धडपड सुरू आहे तसेच रावेर तालुक्यातही वेगळे चित्र नाही. 22 हजार पैकी सुमारे 16 हजार हेक्टरवरील केळीला वाढत्या उन्हाचा फटका बसत असल्याने निसवणीला आलेले घड सटकत आहेत.

जलपातळी खालावल्याने चिंता
गेल्या दहा वर्षात प्रथमच जलपातळी मोठ्या प्रमाणावर खोल गेल्याने केळी पीक धोक्यात सापडले आहे. यंदा दुष्काळाच्या झळा पोहचतील हे निश्चित असतांना शेतकर्‍यांना शेत विहिर पाण्याची पातळी फारशी खालवणार नाही असा विश्वास होता मात्र यंदा गेल्या दहा वर्षात प्रथमच 600 ते 800 फुट खोल पाण्याची पातळी गेली आहे. परीणामी पाण्याचा उपसा करतांना व केळी वाचवतांना शेतकर्‍यांची पार तारांबळ उडत आहे त्यातच अनेक शेतकर्‍यांनी मार्च व एप्रिल महिन्यात खोल जाणार्‍या पाण्याच्या पातळीची परीस्थिती लक्षात घेता सुमारे 30 टक्के शेतकर्‍यांनी केळी पीक उपटून फेकले तर अनेेक शेतकर्‍यांना केळीला वाचवणे कठीण दिसत आहेे. केळी वर अवलंबून व्यवहारावर देखील विपरीत परिणाम झाला आहे. शेतकर्‍यांचा आर्थिक कणाच मोडला गेला आहे.

वाढत्या उन्हामुळे घड सटकणे सुरू
सध्या केळीला एक हजार 165 रुपये भाव व 16 रुपये फरक असा उच्च भाव आहे मात्र कापणीयोग्य केळी वेळेत मुबलक पाणी मिळत नसल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने थेट केळी खोडातून तयार केळी घड सटकणे सुरू झाल्याने केळी उत्पादकांना मोठा फटका सोसावा लागत आहे. उच्च प्रतीचा भाव असला तरी व्यापारी वर्ग बोर्ड भावापेक्षा कमी भाव शेतकर्‍यांना देतांना दिसत आहे. आधी उन्हाच्या चटक्यापासुन केळी वाचवणे कठीण झाले असतांना शेतकरीदेखील कमी भावात केळी देताना दिसत आहे.