बीड-परळी तालुक्यात झालेल्या जलयुक्तच्या कामात गैरव्यवहार करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून बीड जिल्ह्यातील १३८ मजूर सहकारी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी आणि मजूर कंत्राटदारांनी संगनमत करून कृषी बोगस काम दाखवून २ कोटी ४१ लाख ६३६ रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कृषी कार्यालायचे कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १३८ मजूर सहकारी संस्थांमध्ये आष्टी, पाटोदा, मांजालगाव, केज, अंबाजोगाई, परळी, धारूर तालुक्यातील मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.
परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंअंतर्गत विविध काम मजूर झाली आहे. त्यापैकी काही कामामध्ये गैरव्यवहार झाला तर काही काम न करता पैसे उचलले, अशी तक्रार पुण्यातील कृषी आयुक्तांकडे करण्यात आली होते. त्यानंतर विशेष पथकाने परळी तालुक्यात येऊन तक्रारीची शहानिशा करून पाहणी केली. या पाहणीत काम न करता बोगस बिल उचलल्याचे निदर्शनात आले. त्यावरून यापूर्वी परळी आणि अंबाजोगाई कृषी कार्यालयाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.