‘जलयुक्त’ मध्ये सहभाग वाढवा

0

धुळे । धुळे जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान शासनाचे महत्वाकांक्षी अभियान 2015 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये निवड करण्यात आलेल्या 129 गावांमधील 4857 प्रकारच्या विविध उपचारांची कामे रु.115.44 कोटी खर्च करुन पुर्ण करण्यात आलेली आहेत. सदरच्या कामांमुळे निर्माण झालेली साठवण क्षमता 43070.40 स.घ.मी. असून प्रत्यक्षात 23686.58 स.घ.मी. पाणीसाठा निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 47373.16 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे या अभियानात अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी लोकसहभाग वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

6100.08 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार
धुळे जिल्हयात 2016-17 करीता 123 गावांची निवड करुन गावांमधील विविध उपचारांचे 2596 कामे रक्कम रु.132.73 कोटीचा अंतिम अंमलबजावणी आराखडा तयार केलेला आहे. सदर 2596 कामांमध्ये सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, ओघळ नियंत्रण, लहान मातीनाला बांध, विहीर पुनर्भरण, रिचार्ज शॉफट, रोपवन वृक्षलागवड, सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध, सुधारीत गॅबियन बंधारे, वनतलाव, नालाखोलीकरण, सरळीकरण व दुरुस्तीचे कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. सदर 2596 कामांपैकी आजअखेर 1872 कामांना प्रशासकीय मान्यता वितरीत केली असून, पैकी 935 कामे पूर्ण व 1298 कामे प्रगतीपथावर आहेत. सदरच्या कामांमुळे निर्माण झालेली साठवण क्षमता 4483.95 स.घ.मी. असून प्रत्यक्षात 3050.04 स.घ.मी. पाणीसाठा निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 6100.08 हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

स्वखर्चाने लोकसहभागातून कार्य
सन 2017-18 करीता जिल्ह्यास प्राप्त उद्दिष्टांनुसार 95 गावांची निवड करण्यात आलेली आहे. सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, खाजगी उद्योजक, विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांनी स्वखर्चाने लोकसहभागातून 307 तलाव, नाला, नदी इ.मधुन 3765 हे क्षेत्रातून सुमारे 3706793 घ.मी. गाळ काढला असल्याने त्यामुळे 3706793 घ.मी. इतकी साठवण क्षमता असल्याने पाण्याचा साठा वाढला आहे. नाला खोलीकरणाची गाळ काढण्याच्या कामाकरीता अधिकारी कर्मचारी यांच्याकडून प्राप्त निधी अथवा ‘एक दिवसांचे वेतन’ यापैकी इच्छेनुसार उपलब्ध निधी भारतीय स्टेट बँक धुळे येथील CHIEF MINISTER RELIF FUND-J-LYUKT SHIV-R खाते क्रमांक 35203831447 IFSC Code SBIN0000366 या खात्यावर जमा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निधीसाठी केले आवाहन
सदरचा निधी हा लोकसहभागातून जलसंवर्धनाच्या कामाकरीता असल्याने याबाबत शासकीय खातेप्रमुखांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन आपल्या अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांना श्रमदान/लोकवर्गणी याद्वारे जलयुक्त शिवार अभियानात सक्रीय सहभाग देण्यास प्रवृत्त करावे. तसेच जमा होणार्‍या निधीतून अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावामधील कामे पुर्ण करुन भविष्यात धुळे जिल्ह्यामध्ये येणारे दुष्काळारुपी संकटास आळा घालणेकामी आपले अतिशय महत्वपुर्ण योगदान लोकसहभागाद्वारे मिळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार केले आहे.