जळगाव । राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे नियोजन सुरु असताना जिल्ह्यात जे अधिकारी जलयुक्त शिवारची कामे वेळेत पूर्ण करणार नाहीत. त्यांचेवर कारवाई करणाच्या इशारा आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणेच्या अधिकार्यांना दिला. जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिकत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावलचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कृषि उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते.
जलयुक्तच्या कामांचा घेतला आढावा
जिल्ह्यात जलयुक्तच्या चौथ्या टप्पयात गावांची निवड करण्याचे काम सुरु असताना सन 2016-17 (टप्पा क्र. 2) मधील जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाची अद्याप 12 कामे अपूर्ण आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे. ही कामे येत्या एप्रिल अखेर पूर्ण करावी. अन्यथा संबंधित जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिला. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसर्या टप्प्यात जिल्ह्यातील 222 गावांमध्ये विविध यंत्रणामार्फत 146.31 कोटी रुपयांच्या 4857 कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 124.76 कोटी रुपये खर्चाची 4843 कामे पूर्ण झाली आहे तर 14 कामे प्रगतीपथावर असून 3777 कामांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली. तसेच टप्पा क्र. 3 (सन 2017-18) मध्ये जिल्ह्यात 206 गावांमधील 28314 हेक्टर क्षेत्रावर 91.73 कोटी रुपये खर्चाची 4271 कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 2220 कामे कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहेत. यापैकी 832 कामे पूर्ण झाली आहे तर 484 कामे प्रगतीत आहेत. तसेच यावल वन विभगामार्फत 101 कामे करण्यात येणार असून यापैकी 45 कामे पूर्ण तर 35 कामे प्रगतीत असून सर्व यंत्रणांची 1219 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर आतापर्यंत 5.36 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.