अमळनेर । महाराष्ट्राला दुष्काळाच्या समस्येशी गेल्या अनेक वर्षापासून झगडावे लागत आहे. दुष्काळावर कायमचे मात करण्यासाठी तसेच 2019 पर्यत दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवारा अभियान उपक्रम सुरु करण्यात आला. जलयुक्त शिवार हा शासनाचा प्राधान्यक्रमावरील उपक्रम आहे. लोक सहभगातुन व शासनाकडून निधी उपलब्ध होत असल्याने जिल्ह्याभरात जलयुक्तचे कामे होत आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे पुर्णत्वाकडे असून दुसर्या टप्प्यात 5 हजार 500 कामे करण्यात येणार आहे. याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र पहिल्या टप्प्यात झालेले जलयुक्तचे कामे हे निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड होत असून प्रत्यक्ष तसेच आढळून आले आहे.
अमळनेर तालुक्यात आढळले
तालुक्यातील टाकरखेडा गावालगत शिवारात झालेल्या कामात पावसाचे पाणी मुरले आहे. यावरुन जिल्ह्याभरातील कामे ही निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय बळावला आहे. ठेकेदाराकडून अधिक लाभापायी निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जाते. तालुक्यात नालाखोलीकरण व सिमेंट बांध बांधण्याचे काम वेगात गेल्या दोन वर्षात सुरु होते. अमळनेर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी दौर्यावर येणार होते त्याच तालुक्यात जलयुक्तची अशी कामे झालेली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
69 सिमेंट बांध चौकशीच्या रडारवर…
अमळनेर तालुक्यात गेल्या दोन वर्षात 69 नाला सिमेंट बांध झाले आहेत. हे सर्व टेंडर माध्यमातून झाले असले तरी संबंधित अधिकार्यांचा कामावर निरीक्षण असते. या सर्व अधिकार्यांचे नशीब इतके बलवत्तर आहे कि गेल्या दोन वर्षात वाहून निघेल इतपत जोरदार पाऊस झाला नाही. अन्यथा अनेक ठिकाणी असलेल्या तक्रारींचे चित्र समोर पुढे आले असते. कुठे किती पाणी मुरले याचे सचित्र उदाहरण समोर आले असते. प्रचंड गवगवा सुरु असतांना अशीही गावालगत कामे होऊ शकतात. सन 2015-16 मध्ये 36 सिमेंट बांध तर सन 2016-17 मध्ये 33 सिमेंट बांध झाले आहेत. याची सखोल चौकशी क्वालिटी कंट्रोल मार्फत केली जावी अशी अपेक्षा येथील शेतकरी वर्गाची आहे.
दोन वर्षात 493 नालाखोलीकरण…
सन 2015 -16 मध्ये 398 नालाखोलीकरण तर सन 2016-17 मध्ये 95 नालाखोलीकरण झाले आहेत यात देखील पाणीच मुरले आहे. योग्य ती चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येईल.
बांध गळका राहील…
हा सिमेंट बांधाची चक्क साईड वालला पूर्ण भेग पडली आहे. त्यातून पाणी झिरपून जवळच्या शेतात पाणी शिरेल आणि शेतकर्याचे पिक वाहून जाईल. दुसरीकडे ज्या उद्देशाने हा बांधला आहे. तो पण असफल होईल. गावालगत इतके निकृष्ट काम ठेकेदार करू शकतो तर अशी किती कामे या ठेकेदाराकडे आहेत याची चौकशी व्हावी. अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
कृषी विभागाचा घोटाळा
जलयुक्तच्या कामात कृषी विभागाने घोटाळा केला असल्याचा जलयुक्तच्या कामावरुन दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रकल्पाला जास्तीचा निधी लागतो. म्हणून शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत अनेक कामे केली त्यात नाला खोलीकरण, सिमेंट बांध शेततळे, गाळ काढणे, समतल चर, अशी कामे हाती घेऊन दरवर्षी टंचाईग्रस्त गावांची निवड केली जात आहे. यामाध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी ओतला असला तरी त्यात भ्रष्टाचार पाझरल्याबाबत तक्रारी होत्या. एकीकडे ज्या सिंचन कामासाठी पैसा खर्च होत आहे. त्यात मात्र वेगळेच सिंचन होऊ लागले आहे.