जलयुक्त शिवारासाठी 206 गावांची निवड

0

जळगाव। जलयुक्तशिवार अभियानांतर्गत होणार्‍या विकास कामाचा तिसर्‍या टप्प्या लवकरच सुरु होणार असून या टप्यात जिल्ह्यातील 206 गावांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची बैठकीचे सोमवारी 17 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात तिसरा टप्पा राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्यात 232 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये सहा हजारांवर कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

अभियानामुळे भूजल पातळी वाढल्याचा प्रशासनाचा दावा
या अभियानांतर्गत झालेल्या कामांचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जलश्री या संस्थेतर्फे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले होते. यात जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे कृषी विभाग जिल्हा परिषद अधिकार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. पहिल्या टप्प्यातील कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नव्हती. या अभियानात मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी पद्धतीने कामे करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील 222 गावांची निवड करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यातील कृषी भूजल सर्वेक्षण विभागाकडील कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दीड महिन्यात ही कामे पूर्ण होणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. तर या अभियानामुळे भूजल पातळी वाढल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. जलसाठ्यांचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करा सध्य:स्थितीततीव्र ऊन तापत आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमधील पाणी पातळी खालावत आहे. पावसाळ्याला अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 20 जूनपर्यंत पुरेल एवढे पाणी जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये आरक्षित करा, असे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी दिले आहेत. जलस्रोतांमधून होणार्‍या उपशावर नियंत्रण ठेवण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.