राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 15 लाख 76 हजार 117.64 टी.सी.एम. पाणीसाठी निर्माण झाला आहे. यातून 20 लाख 62 हजार 212 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. तर 11 हजार 493 गावांपैकी 8 हजार 7 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण झाली आहे. टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वांसाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी अभियानाचे नुकतेच जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ख्रिस्टलिना जॉर्जिया यांचेसमोर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाच्या माध्यमातून या योजनेचे फलित समजून घेतल्यानंतर श्रीमती जॉर्जिया यांनी या योजनेचे मनसोक्त कौतूक केले.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना खूप प्रभावी असून ज्या पध्दतीने लोकसहभागातून ही योजना राबविली जात आहे ते अनुकरणीय असल्याचे गौरवोद्वगार त्यांनी यावेळी काढले आहे. त्याचबरोबर राज्याच्या या अभियानाचा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा करुन महाराष्ट्राचा गौरव केला आहे. गेल्या दोन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे आणि यावर्षी राज्यात होत असलेल्या पावसामुळे या अभियानाचे यश व दृष्य परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून राज्यात करण्यात आलेल्या विविध कामांमुळे हे अभियान दुष्काळी भागासाठी वरदान ठरले आहे. दोन वर्षात या अभियानातंर्गत राज्यातील11 हजार 493 गावांची निवड करण्यात आली होती. या गांवामध्ये जलसंधारणाची 4 लाख 14 हजार 615 कामे करण्यात आली. त्यापैकी 3 लाख 86 हजार 202 कामे पूर्ण झाली तर 28 हजार 413 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांमध्ये गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. या अभियानातंर्गत शासकीय योजना व लोकसहभागातून गाळ काढण्याची 26 हजार 759 कामे पूर्ण झाली आहे. या कामांच्या माध्यमातून 2562.44 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 5193.02 कि.मी. लांबीचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे करण्यात आले. या कामांची किंमत 1050.81 कोटी रुपये आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्य शासनाने दोन वर्षात 4175 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन दिला असून आतापर्यंत 2744.59 कोटींचा निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानात 15 हजार 408 साखळी,सिमेंट नालाबांधच्या कामांचा समावेश आहे. यापैकी 11 हजार 83 कामे पूर्ण झाली असून या कामांवर आतापर्यंत 1171.58 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तसेच 1 लाख 20 हजार 352 इतक्या इतर कामांचा समावेश असून त्यापैकी 96 हजार 558 कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर आतापर्यंत 1573 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांपैकी 8 हजार 7 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण झाली असून 1 हजार 828 गावामधील कामे 80 टक्के पूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी मागील वर्षी विशेष निधी आणि कर्न्व्हजन्समधून 5 हजार 480 कोटी 73लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. जळगाव जिल्ह्यातही जलयुक्त शिवार हे अभियान अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत या अभियानात जिल्हयातील 660 गावांची निवड करण्यात आली आहे.या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आणि झालेल्या कामांच्या माध्यमातून आतापर्यंत 52 हजार 442 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून 74 हजार 991 हेक्टर क्षेत्राला एक वेळ संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. तर 232 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण झाली आहे.तसेच जिल्हयात आतापर्यंत 10 हजार 859 कामे पूर्ण झाली असून 1 हजार 240 कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हयात सन 2015-16 मध्ये या अभियानातंर्गत 232 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये जलसंधारण व इतर प्रकारची7 हजार 316 कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 138 कामे पूर्ण झाली तर 178 कामे प्रगतीपथावर आहे.
या कामांमध्ये गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.त्यासाठी 121.56 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता.करण्यात आलेल्या कामांवर डिसेंबर 2016 पर्यंत 119.49 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.या अभियानात निवड झालेल्या गावांपैकी 228 गावांतील कामे 100 टक्के पूर्ण झाली आहे.तर 4 गावातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.या कामांच्या माध्यमातून जिल्हयात 36 हजार 118 टी.सी.एम.साठवण क्षमता निर्माण झाली आहे.या साठवण क्षमतेमुळे 58 हजार 667 हेक्ट्र क्षेत्राला एक वेळ तर 29 हजार 333 हेक्टर क्षेत्राला दोन वेळेस पाणी देता येणार आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे 232 गावांपैकी 8 गावे 100 टक्के ठिबकखाली आणण्यात यंत्रणेला यश आले आहे.जिल्हयात या कामांच्या माध्यमातून 36.34 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.त्यापैकी 9.45 लाख घनमीटर गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे.यामध्ये श्री.साई शिर्डी संस्थान, श्री.सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबई, आर्ट ऑफ लिव्हींग, हिरा उद्योग समुह, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे.जिल्हयात जलयुक्त शिवार च्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे 211.6 किलोमीटर लांबीची रुंदीकरणाची व खोलीकरणाची कामे झाली आहे.तसेच नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत जिल्हयात 9 नद्यांवर 84 साखळी सिमेंट बंधारे बांधणीचे प्रकल्प करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार अभियानाचे दृश्य परिणाम लक्षात घेऊन शासनाने सन 2016-17 मध्ये या अभियानातंर्गत जिल्हयातील 232 गावांची निवड केली होती. या गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी जिल्हास्तरीय समितीने 157.79 कोटी रुपयांचा आराखडा केला होता. त्यानुसार जिल्हयाला 161.32 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.निवडण्यात आलेल्या गावामध्ये 4 हजार 934 कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते.जलयुक्त शिवार अभियान हे शासनाचे महत्वाकांक्षी अभियान असल्यामुळे या अभियानाचा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे आणि जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी वेळोवेळी आढावा घेऊन, तसेच सुरु असलेल्या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन ही कामे अधिकाधिक चांगली होण्यासाठी संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सुचना केल्या आहेत. त्यानुसार या अभियानात जिल्हाभर 4783 कामे सुरु करण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 721 कामे पूर्ण झाली आहेत तर 1 हजार 62 कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांमुळे जिल्हयात 16 हजार 324 टी.सी.एम.साठवण क्षमता निर्माण झाली आहे.या साठवण क्षमतेमुळे 32 हजार 648 हेक्क्टर क्षेत्राला दोन वेळेस पाणी देता येणार आहे. या कामांमध्ये मेहरुण तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा समावेश असून या तलावातून 1 लाख 3 हजार 586 घन मीटर गाळ काढण्यात आला आहे.यासाठी 1 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.तसेच आर्ट ऑफ लिव्हींगच्या मदतीने जिल्हयात 92 हजार 611 घट मीटर गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहे.या अभियानात जिल्हयात यावर्षी 1 हजार 216 नाला खोलीकरणाची कामे पूर्ण झाली असून आतापर्यंत 243.2 किलोमीटर लांबीचे नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली आहे.तसेच नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत जिल्हयात 5 नद्यांवर 21 सिमेंट नाला बांध बांधण्यात आले आहे.यामुळे सिंचन क्षमता वाढण्यात मदत झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयाला जलयुक्त करण्यासाठी तिसर्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियानात लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्था, शेतकरी यांचा सहभाग वाढल्याने जलयुक्त शिवार अभियान हे आता अभियान न राहता एक लोकचळवळ झाल्याचे दिसून येतआहे.
विलास बोडके
जिल्हा महिती अधिकारी
मो.नं. 9870934965