पुणे । राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ग्रामीण भागांचा विकास होत आहे. ओढा रुंदीकरण, बांध-बंदिस्ती, पाणी अडवा-पाणी जिरवा यामुळे गाव सुजलाम्-सुफलाम् होत आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार योजना राबवून तालुका दुष्काळ संपविण्यास मदत करणार्या पुरंदर तालुक्याने यावर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कामांच्या बाबतीत पुुणे जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे. विभागीय कार्यालयातंर्गत पानवडी आणि पिंगोरी गावांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी दिली आहे.
लाखो टीएमसी पाणी साचण्यास मदत
राज्यातील विविध गावांमधील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शासनाने त्यावर उपाय म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामेही सुरू करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने ओढा रूंदीकरण, बांध-बंदिस्ती, पाणी अडवा-पाणी जिरवा यांना प्राधान्य दिल्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली. यासाठी नागरिकांसह शेतकर्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. उन्हाळ्यात गावोगावी झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे लाखो लीटर पाणी साठवण्यास मदत झाली. त्यामुळे विहीर, ओढे-नाले तुडूंब वाहू लागले. शासनाच्या योजनेमुळे लाखो टीएमसी पाणी साचण्यास मदत झाली आहे. त्याचा फायदा शेतकर्यांना झाला आहे. अनेक गावे आणि तालुक्यांमधील दुष्काळ कायमचा मिटला आहे.
उत्तम काम करणार्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी शासनाकडून बक्षीस देण्यात येते. राज्य शासनाने केलेल्या सर्व्हेनुसार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत. त्यामुळे तालुक्याला प्रथम क्रमांकाचे 35 लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहे. तर योजना उत्तम राबविल्याबद्दल पुणे जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यास 30 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर विभागीय स्तरावर जिल्ह्यातील पानवडी आणि पिंगोरी गावांची प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना अनुक्रमे 1 लाख आणि 75 हजारांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत चांगली कामे करण्यात आली. त्यामध्ये पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यामुळे यंदा राज्यात प्रथम क्रमांकाचा मान पुरंदरला मिळाला आहे. शासन, जिल्हा परिषद, शेतकर्यांच्या माध्यमातून योजनेला गती देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. योजनेमुळे लाखो लीटर पाणी जमिनीत मुरविण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.
– यशवंत शितोळे