मुक्ताईनगर । जलयुक्तशिवार अभियानातून सन 2017/16 मध्ये तालुक्यात करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यात तालुकास्तरीय समितीने संपुर्ण गावांची पाहणी करुन यामध्ये 20 गावांची अभियानासाठी निवड केली. टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 या संकल्पनेनुसार जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानात चालु वर्षासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील 20 गावांची निवड झालेली आहे.
शिवार फेर्यांद्वारे माहितीचे संकलन
तालुक्यात तरोडा, कोथळी, सुकळी, सारोळा, ढोरमाळ, जोंधनखेडा, हलखेडा, कुर्हा, चारठाणा, मोरझिरा, निमखेडी बुद्रूक, बोदवड, धामणगाव, पुरनाड, मधापुरी, कर्की, वायला, डोलारखेडा, नांदवेल, पिंप्रीपंचम या गावांचा समावेश आहे. जलयुक्तशिवार अभियानांतर्गत तालुकास्तरीय समितीने निवडलेल्या गावांमध्ये जलसंधारणाची नेमकी कोणती कामे व्हावीत? याची माहिती संकलित करण्यासाठी ठिकठिकाणी शिवार फेर्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यानंतर 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये नागरिकांनी सुचवलेल्या कामांचा समावेश अभियानात करण्यात आला. यानतंर आता तालुकास्तरीय समिती प्रत्येक गावात किती कामे करण्यात यावीत, या प्रत्येक कामांवर होणारा खर्च याचा कृती आराखडा तयार करेल, असे सुत्रांनी सांगितले.
यापूर्वी तालुक्यात सन 2015/16 या वर्षात सात गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली. सन 2016/17 मध्ये सहा वेगवेगळ्या शासकीय विभागांकडून तालुक्यात 592 कामे झाली. यासाठी 14 गावांमध्ये 11 कोटी 11 लाख रुपये निधी झाला. मात्र, मनरेगासोबतच जलयुक्तच्या कामांमध्ये पुढारी-ठेकेदार-अधिकार्यांच्या लॉबीने चांगलेच हात धुवून घेतले. यामुळे अनेक गावांमध्ये कामांविषयी तक्रारी आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन कामाची गुणवत्ता टिकून राहिल्यास शासनाचा यामागील हेतू सफल होऊ शकेल.