जलवाहिनीला जोडलेले पंप जप्त

0

हडपसर । महापालिकेच्या जलवाहिनीस विद्युत पंप जो़डून पिण्याचे पाणी उपसा करणारे 35 पंप लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केले. मात्र, ‘आम्हाला पुरेसे व नियमित पाणी द्या, नंतरच कारवाई करा,’ असा महिलांनी आरडाओरडा केला. संतप्त महिलांनी आक्रोश करीत लष्कर पाणीपुरवठा विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला व अधिकार्‍यांना घेराव घातला. अखेर अधिकार्‍यांनी माघार घेत विद्युत पंप नागरिकांना परत केले.

35 पंप जमा केले
लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 23) रात्री धडक मोहीम राबवीत जलवाहिनीला विद्युत पंप लावून पाणी उपसा करणारे 35 पंप जप्त केले. त्यानंतर लष्कर पाणीपुरवठा कार्यालयावर महिलांनी थेट मोर्चा काढला. मोर्चानंतर महिलांनी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्याशी संपर्क साधला. कारवाईबाबत त्यांना माहिती दिली. ससाणे लष्कर पाणीपुरवठा कार्यालयात पोहचले. त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

नागरिकांच्या मागण्या
आम्हाला नियमित व पुरेशे पाणी द्या, नंतरच कारवाई करा.
विद्युत पंप विकत घेणे व महिन्याला अधिकचे वीज बील आम्ही का भरू?
उंच भागात नळाला पाणीच येत नाही.
विद्युत पंपाने उपसा केला तरच थोडेफार पाणी मिळते.
48 टक्के केलेली पाणी कपात करून आमच्यावर अन्याय करू नका.
पंपाद्वार पाणी उपसा करण्यास नागरिकांची इच्छा नाही, याला महापालिकाच जबाबदार आहे.
आम्ही नियमित कर भरतो, हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. अन्याय सहन करणार नाही.

अनेक सोसायट्यांना वर्षभर टँकरचे पाणी
हडपसर परिसराला 48 टक्के पाणीपुरवठा कमी होत आहे. उंच भागात नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाण्याची वेळ नियमित नाही. पाण्याला दाब कमी आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत. अनेक सोसायट्यांना वर्षभर टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेला कर भरल्यामुळे त्यांना पाणी देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. आधी पाणीपुरवठा सुरळीत करा, नंतरच कारवाई करा. तसेच कारवाई करायची असेल तर शहरातील अनधिकृत नळजोड अगोदर तोडा. शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा होतो. हडपसरवासीयांवर अन्याय करू नका, असे कार्यकारी अभियंता संतोश पावरा यांना ससाणे यांनी सुनावले.

…तर पंप विकत घ्यावे लागणार नाहीत
आमच्या नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. कधी आले तर पाण्याची वेळ निश्‍चित नसते. सर्व कामे बाजूला ठेवून आम्हाला पाण्याची वाट पाहावी लागते. कामावर जायचे की पाण्यासाठी घरी थांबायचे. अनेकदा शाळा बुडवून आम्हाला आमच्या मुलांना पाणी भरण्यासाठी घरी ठेवावे लागते. पंपाद्वारे पाणी उपसा करण्याची आमची इच्छा नाही. महापालिकेने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केल्यास आमचे दरमहा येणारे अधिकचे 100 रुपयांचे वीजबील कमी येईल. तसेच नागरिकांना दहा हजार रुपये खर्चून पंप विकतचे घ्यावे लागणार नाहीत. प्रत्येकवेळी टँकरचे पाणी विकत घेण्याची आमची परिस्थीती नाही.’
– रतन गायकवाड, महिला नागरिक