जळगाव। शहराच्या काही भागात दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाणी पुरवठा होत आहे. या पिवळसर पाण्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहण्यास मिळत आहे. तर प्रशासनातर्फे पाण्याचे सॅम्पल लॅबमध्ये तपासणी करून आणल्याने पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा दावा खोडून काढण्यासाठी नगरसेवक अनंत जोशी यांनी सकाळी 4 वाजता पाणी पुरवठ्याचे अशोक पाटील यांना सोबत घेऊन साने गुरूजी कॉलनी, टेलीफोन नगर या परिसरात जावून सॅम्पल गोळा केले आहेत. यावेळी जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला असता तेथील नागरिकांनी तीव्र शद्बात रोष व्यक्त केला.
पिवळसर पाण्यावर उपाय नाही
वाघूर धरण जलशुद्धीकरण केंद्रास नगरसेवक जोशी दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेले अधिकारी यादव यांनी जोशी यांना पाण्याचे नमुने आम्ही दोन ते तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासले असून पाणी पिण्यास योग्य आहे. ते अपायकारक नसल्याचे सांगितले. पिवळसर पाण्यावर काही उपाय नाही का याची विचारणा जोशी यांनी केली असता केमीस्ट विजय यादव यांनी यावर काही एक सोल्युएशन नसल्याचे स्पष्ट केले. शहरात गेल्या दोन महिन्यापासून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याचा नमुना जोशी स्वत: वेगळ्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविणार आहेत. यादव यांनी पिवळसर पाणी येत असले तरी ते पिण्यास योग्य असल्याचे सांगितले.
अॅलेम मिश्रण युनीट बंद
जोशी यांनी धरणाची पहाणी केली असता तेथे वॉश आऊटची सुविधा नसल्याचे दिसून आले. धरणातील सँड बेडची दररोज धुलाई केली जात नाही. पाण्यात ब्लिचिंग, अॅलेमचे योग्य प्रमाण ठेवण्यात यावे असे जोशी यांनी सांगितले. सँड बेडचे फिलींग झालेले नाही. क्लोरीन, ब्लिचींग, अॅलेमचे मिश्रण करण्याचे युनीट किरकोळ खर्चा अभावी 1 वर्षांपासून बंद आहे. तसेच 10 पैकी 1 सँड ब्लेड अनेक वर्षांपासून बंद असल्याचे जोशी यांना आढळून आले आहे. धरणाचा वॉशआऊट केला नसल्याचे दिसत असल्याचा आरोप नगरसेवक जोशी यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.