जलसंधारणासाठी ‘संस्कृती’तर्फे नदी पुनर्जीवन प्रकल्प

0

चोरवड गावाजवळील नदीचे खोलीकरण ; जलपातळी वाढवण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन

भुसावळ- यंदा पाणीटंचाईचे संकट पाहता दुष्काळावर मात करून पाणीटंचाईचे संकट निवारण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे शहराच्या जवळपास असलेल्या नद्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. शहराच्या अवती-भोवती असलेल्या नद्यांमध्ये कचर्‍याचे प्रमाण वाढल्याने त्यात खोली राहिलेली नाही नद्या या मातीने पूर्ण भरून गेल्याने नद्यांनी रस्त्याचे रुप घेतले आहे. अश्या नद्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे श्रमदानातून खोलीकरण करून त्यातील कचरा तसेच माती काढून त्यात दगड मातीचे बांध बांधायला सुरवात करण्यात आली.

चोरवडजवळील नदीचे खोलीकरण
पहिल्या टप्प्यात सुमारे पाच तास श्रमदान करण्यात आले. संस्कृती संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अशोक चौधरी ह्यांचा हस्ते श्रीफळ फोडून कार्याला सुरवात करण्यात आली. भुसावळ-जामनेर रोडवरील चोरवडजवळ असलेल्या नदीचे खोलीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी जेसीबी यंत्रणा शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपूरे यांच्या सहकार्यातून उपलब्ध झाली. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जलसंधारणाला प्राधान्य दिले पाहिजे, हा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी फाउंडेशनने सोशल नेटवर्किंग साईटची मदत घेतली आहे. जास्तीत-जास्त लोकसहभाग वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सेवाभावी तत्वावर जेसीबी, ट्रॅक्टरसह यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी ह्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निसर्गाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून हे कार्य केले जात आहे. आपला सुटीचा दिवस सत्कारणी लागावा ह्या जास्तीत जास्त संख्येने संस्थेसोबत श्रमदानासाठी यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. नदीच्या अवती-भोवती पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केले जाणार आहे.

यांचा अभियानात सहभाग
संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपूरे, संस्थेचे नदी पुनर्जीवन प्रकल्प प्रमुख अशफाक तडवी, तुषार गोसावी, सदस्य अजित गायकवाड, प्रियंका पाराशर, पराग चौधरी, मंगेश भावे, सोनू तडवी, सोहिल कच्छि, संस्कार मालविया, तेजस गांधेले, हर्षवर्धन बाविस्कर, अजय पाटील, आरिफ तडवी, हर्षल येवले, सावन चौहान, इकबाल तडवी, दानिश तडवी इत्यादींचा श्रमदात सहभाग होता.

सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा
श्रमदानातून जलसंधारण व्हावे ह्यासाठी संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. श्रमदानाला यंत्र सामग्रीची मदत मिळाल्यास कार्य अधिक प्रमाणात होईल. यासाठी शहरातील दात्यांनी यंत्र सामग्री उपलब्ध करून दिल्यास मदत मिळेल. उपक्रमात इतर सेवाभावी संस्थांनी तसेच शहरातील नागरीकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी केले आहे.