जलसंपदाचा दापोडीतील बांधकाम व यांत्रिकी उपविभाग राहणारच!

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – दापोडी येथील जलसंपदा विभागातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे, तसेच या विभागाची 72 एकर जमीन अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी दिले. पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पुढाकार घेऊन याविषयीच्या बैठकीचे आयोजन मंत्रालयात केले होते. शिवतारे यांच्या दालनात ही बैठक झाली.

उपविभाग होणार होता बंद
आमदार चाबुकस्वार यांनी यावेळी या विभागाची विस्तृत माहिती मंत्र्यासमोर विषद केली. जलसंपदा विभागाचा दापोडी येथे नियोजन व संकल्पचित्र हा उपविभाग कार्यरत आहे. परंतू ‘पुरेसा कार्यभार शिल्लक नाही’ या मतानुसार शासनाने दापोडीतील हा उपविभाग बंद करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या विभागाची चार कार्यालये आहेत. पैकी अब्जावधी रूपये किंमत असलेली 72 एकर जागेचे संरक्षण व उपाययोजना याबाबी लक्षात घेऊन स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवण्याचा निर्णय राज्यमंत्र्यांनी घेतला.

महापालिकेला नोटीस देण्याचे आदेश
तसेच मोकळया जागेची तातडीने मोजणी करणे, संरक्षण भिंत उभारणे, अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा देणे, जलसंपदाच्या खात्याच्या जागेत उभारलेल्या टपर्‍या, भाजी मंडई, यांचे अतिक्रमण काढणेचा निर्णय घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेने जलसंपदा खात्याची काही जागा विकासकामांसाठी घेतली, होती मात्र करारनाम्यानुसार पालिकेने कुठलीच पूर्तता केली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याने पिंपरी महापालिकेला ही नोटीस देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

हे होते उपस्थित
शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे, मुख्य अभियंता एस. एन. बोडके, अधिक्षक अभियंता पुंढलिक थोटवे, कार्यकारी अभियंता आनंद काळमेघ, महाराष्ट्र राज्य क्रास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण धिवार, नागेश घटकांबळे, कैलास पवार, महेंद्र कांबळे. सचिन कांबळे आदी उपस्थित होते.