पुणे – जलसंपदा विभागाने गेल्या दोन वर्षामध्ये बेबी कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी १४कोटी रुपयांपैकी फक्त नऊ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. उरलेले पाच कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल सजग नागरिक मंचने केला आहे. या मागणीमुळे पुण्यातील कालवा फुटी प्रकरण आणखी वादग्रस्त होवू लागले आहे. या प्रकरणातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे.
बेबी कॅनॉलची दुरवस्था दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणल्यानंतर पालकमंत्री आणि जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत सजग नागरिक मंचची बैठक झाली होती. त्यावेळी २०१६साली राज्य शासनाने बेबी कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी १४कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिले होते असे समजले. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली असता धक्कादायक माहिती समोर आली. जलसंपदा विभागाने १४कोटी पैकी फक्त नऊ कोटी खर्च केल्याची माहिती समजली. कालव्याची दुरुस्ती योग्य आणि पूर्ण प्रमाणात झालेली नाही. कालव्याच्या दुरवस्थेमुळे मुंढवा जॅकवेलमधून साडेपाचशे ऐवजी साडेतीनशे एमएलडी पाणी शेतीसाठी पुरवले जात आहे त्यातून एकीकडे शेतीचे नुकसान होत आहे आणि दुसरीकडे पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जलसंपदाचा नियोजनशून्य कारभार यासाठी जबाबदार असून पाच कोटी रुपये गेले कोठे आणि कोणाच्या परवानगीने वळविले याची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.