जलसंपदा मंत्र्यांच्या मध्यस्तीने वरणगावात वीजपुरवठा पूर्ववत

0

पालिकेकडे एक कोटी 76 लाखाची थकबाकी ; स्वतंत्र वीज बिलाअभावी वाढली अडचण

वरणगाव– वीज बिल विभागणीची मागणी करूनही वीज वितरण कंपनीने बिल न देता थकबाबकी पोटी वरणगाव शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केल्याने शहरातील नागरीक गेल्या तीन दिवसांपासून अंधारात होते. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी याबाबत अधीक्षक अभियंता यांच्याकडे धाव घेतली तस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीने तीन लाख रुपयांचा धनादेश दिल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त केले.

वरणगाव पालिका फेब्रुवारी 2015 मध्ये अस्तित्वात आली. यानंतर पालिकेचा स्वतंत्र कारभार पाहिला जात होता. तत्पूर्वी ग्रामपंचायत असताना शहरातील दिवाबत्ती व पाणीपट्टीची वसुली ग्रामपंचायतीकडून करून जिल्हा परीषदेेकडे वर्ग केली जात होती. वीज बिलदेखील जिल्हा परीषदेकडून भरण्यात येत होते मात्र फेब्रुवारी 2015 मधे नगरपालिकेची निर्मिती झाल्याने दिवाबत्ती व पाणीपट्टी बाबतचा कारभार पालिकेकडे आला. यानंतर 2016 मध्ये थकबाकी बाबत वीज वितरण कंपनीकडून पालिकेला नोटीस मिळाली. यावेळी मुख्याधिकारी यांनी कंपनीला पत्र देवून आपण फेब्रुवारी 2015 नंतरची व ग्रामपंचायत असतानाचे वीज आकारणी बाबतची माहिती द्यावी परंतु आजतगायत कंपनीकडून फक्त थकबाबकी बाबतचे पत्र दिले परंतु स्वतंत्र वीज बिल आकारणी बाबतची माहिती दिली जात नसल्याने पालिकेच्या वतीने बुधवारपर्यंत 11 लाख भरण्यात आले होते परंतु पालिकेच्या नावे एक कोटी 76 लाखाची थकबाकी दिसत असल्याने वरणगाव कार्यकारी अभियंता यानी बुधवारी वीजपुरवठा खंडीत केल्याने शहरात दोन दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य होते.

विभागणी केल्यानंतर अडचण होणार
फेब्रुवारी 2015 पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सदरच्या दिवाबत्तीचे वीज भरणा जिल्हा परिषदेच्या वतीने करणे अपेक्षित होते परंतु यावेळी त्यांनी वीज बिलाचा भरणा न झाल्याने थकबाकी वाढली. वीज वितरण कंपनीने वीज बिलाची विभागणी करून दिल्यास याबाबत जिल्हा परीषद व ग्रामविकास मंत्रालयात प्रस्ताव पाठवून सदरची थकबाकी भरता आली असती मात्र सदरच्या विभागाकडून स्वतंत्र बिल मिळत नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

मंत्र्यांच्या पुढाकाराने दिलासा
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विष्णू खोले, रवी सोनवणे, कामागार नेते मिलिंद मेढे, संजीव कोलते, इरफान पिजारी, साजीद कुरेशी यांनी अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्याकडे धाव घेतली. याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनादेखील दुरध्वनीवरून सांगण्यात आली. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून त्वरीत वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत आदेश दिले. यावेळी तीन लाखांचा धनादेश देवून व पालिकेच्या कार्यकाळातील थकबाकी 14 व्या वित्त आयोगातून टप्प्याने भरण्यात येईल. तसेच ग्रामपंचायतीच्या काळातील थकबाकीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या पुढाकारानंतर शुक्रवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

कामकाजामुळे अडचण -नगराध्यक्ष
बुधवारी गटनेता बदल व अपात्रतेबाबतची तारीख असल्याने औरंगांबाद उच्च न्यायालयात होतो तर बुधवारी नाशिक येथे नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांच्या बैठकीला असल्याने दोन दिवस वीजपुरवठा खंडीत झाला. मात्र शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

वीज बिलाची विभागणी बाबत पत्र
दिड वर्षापूर्वी थकबाकीचे पत्र येताच त्यावेळेसपासून पालिका व ग्रामपंचायत कार्यकाळातील वीज बिलाची विभागणी करण्याबाबतचे पत्र दिले होते. वेळ प्रसंगी ग्राहकमंचात देखील जाण्याची तयारी दर्शवली होती मात्र कंपनीने अद्यापही विभागणी बाबतचे पत्र दिले नाही. आता विभागणी करून बिल मिळाल्यास नक्कीच थकबाबकी भरण्या बाबत उपाययोजना केल्या जातील, असे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले.