जल, जंगल आणि जमीन समृद्ध करण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

0

रावेर येथे डॉ.श्रीराम डाल्टन : सरदार जी.जी.हायस्कूलमध्ये व्याख्यान

रावेर- पिण्याचे पाणी मोफत मिळणे हा आमचा हक्क असून जंगल आणि जमीन हा देखील आमचा अधिकार आहे. यासाठी फ्री वॉटर इंडिया हे मिशन सुरू केले असून याच्या प्रबोधनासाठी नागरीकांचा सहभाग मिळत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नद्या कोरड्या ठणठणीत असून शहरे वाढत आहे व जंगल कमी होत आहे. ही शोकांतीका असून पर्यावरणाचा र्‍हास मोठ्या प्रमाणात होत असल्याने सजीव सृष्टीला धोका निर्माण झाल्याचे प्रतिपादन मूळचे झारखंड येथील रहिवाशी असलेले व चित्रपट सृष्टीत निर्माता म्हणून काम करणारे डॉ.श्रीराम डाल्टन यांनी येथे केले. जल, जंगल आणि जमीन बचावासाठी लोकचळवळ उभी रहावी म्हणून पदभ्रमंती केली असून रावेर येथे विद्यार्थ्यांशी झालेल्या सुसंवादात त्यांनी वरील तीनही जीवनावश्यक बाबींवर प्रकाश झोत टाकला.

रावेरच्या सरदार जी.जी.हायस्कूलमध्ये व्याख्यान
झारखंड येथील पलामू जिल्ह्यातील डाल्टन गंज येथील रहिवाशी असलेले डॉ.श्रीराम डाल्टन हे मुंबई येथील चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक लहान-मोठे चित्रपट त्यांनी निर्माण केले आहेत. त्यांचा प्रत्येक सिनेमा जनजागृती आणि सामाजिक बांधीलकी ठेवणारा असून त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते देखील सन्मानीत करण्यात आले आहे परंतु 15 मे पासून त्यांनी जल, जंगल, जमीन या विषयावर चळवळ सुरू केली असून सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून शहरांसह छोट्या-मोठ्या गावात त्यांनी प्रबोधन केले. रावेर येथे त्यांचे आगमन झाल्यावर सरदार जी.जी.हायस्कूल येथे वनविभाग, माऊली फाऊंडेशन व श्रीराम फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तहसीलदार विजयकुमार ढगे, वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, माऊली फाऊंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, दीपक नगरे, मुख्याध्यापक ए.एस.कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात तहसीलदार ढगे यांनी जल, जंगल, जमीन यांच्या संवर्धनासाठी रावेर तालुक्यात सुरू असलेल्या योजनांविषयी माहिती दिली तर वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी वृक्ष संवर्धन, ग्रीन आर्मी याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन जितेंद्र पाटील यांनी तर आभार वनरक्षक यशवंत पाटील यांनी मानले. यावेळी वनपाल शरद सोनवणे, अरविंद धोबी, वनरक्षक प्रकाश सलगर, उपमुख्याध्यापक तडवी, शिक्षक अनिल महाजन, युवराज माळी, गणेश महाजन, तारीक नुरी यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.