खगोल अभ्यासक मंडळाचे अमोघ जोशी यांची माहिती ; भाऊंच्या उद्यानात प्रात्यक्षिकाव्दारे दाखविण्यात येणार ; 12 वाजून 25 मिनिटांनी सुर्य डोक्यावर, सावली पायापाशी पडणार
जळगाव- आपण नेहमी म्हणतो की रोज 12 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर येतो. मात्र सावल पायाजवळ येत नाही. वर्षातून दोन वेळा असा क्षण येतो की सुर्य डोक्यावर आणि त्याची सावली आपली पायापाशी पडते. निसर्गाच्या या अदभूत घटनेला ’शून्य सावली दिवस’ किंवा ’झीरो शडो हे’ असे म्हणतात. जळगावकर 26 मे रोजी 12 वाजून 25 मिनिटांनी शून्य सावली दिवस अनुभवणार असल्याची माहिती खगोल अभ्यास मंडळाचे अमोघ जोशी यांनी कळविली आहे. भाऊंच्या उद्यानात ’शून्य सावली क्षण’ कसा होतो हे प्रात्यक्षिकाव्दारे दाखविण्यात येणार आहे.
पृथ्वीवर तीन काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीच्या मध्य रेषेला विषुववृत्त म्हणतात. या रेषेच्या वर उत्तरेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला कर्कवृत्त आणि मध्य रेषेच्या खाली दक्षिणेस 235 अंशावर असलेल्या रेषेला मकरवृत्त म्हणतात. 21 मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो. त्यावेळी तो 0 अंशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो त्याला आपण उत्तरायण म्हणतो. सूर्य +23.5 अंश उत्तरेस जातो. परत फिरून 22 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. त्यावेळी सूर्य 0 अंशावर असतो. त्यानंतर तो दक्षिणेकडे सरकायला लागतो त्याला आपण दक्षिणायन म्हणतो. सूर्य -23.5 अंश दक्षिणेस जातो.
काय आहे शून्य सावली दिवस
सूर्याच्या या उत्तर व दक्षिण प्रवासाच्या काळात शून्य सावली दिवसाची अद्भुत घटना घडते. प्रवासाच्या या काळात सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर (लॅटीट्युड) उगवतो. इंग्रजीत त्याला ‘सन डेक्लीनेशन’ (सूर्याची क्रांती) असे म्हणतात. प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. आपण कर्कवृत्ताच्या जवळ रहातो. जळगाव 21.00 अंश उत्तर या अक्षांशावर आहे. 21 मार्च ते 21 जून या काळात 26 मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून आपल्या शहरात 12 वाजून 25 मिनिटांनी झीरो शडो डे असतो. 21 जून नंतर परतीच्या प्रवासात 18 जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन (सूर्याची क्रांती) परत जळगावच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसर्यांदा आपल्याकडे ’झिरो शडो डे’ असतो.
प्रात्यक्षिकाव्दारे क्षण अनुभवण्याची संधी
या भौगोलिक घटना प्रात्यक्षिकव्दारे आपण समजून घेऊ शकतो. जळगाव खगोलप्रेमी ग्रुप, जळगाव यांच्या तर्फे या अदभूत घटनेचे आयोजन 26 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजता भाऊंच्या उद्यानात करण्यात आलेले आहे. या प्रसंगी जळगाव खगोलप्रेमी ग्रुपने तयार केलेले सौर घड्याळ (सनडायल) ही ठेवण्यात येणार असून त्याव्दारे स्थानिक वेळे नुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी ’शून्य सावली क्षण’ कसा होतो हे प्रात्यक्षिकाव्दारे दाखविण्यात येणार आहे. हा एक वेगळा अनुभव आहे तरी खगोलप्रेमींनी अवश्य उपस्थित राहून त्यामागील विज्ञानही समजून घ्यावे.