जळगावचा सांस्कृतिक परिघ विस्तारतोय….

0

दस्तरखुद्द नटश्रेष्ठ बालगंधर्वाची भुमी…. असणार्‍या जळगावचे सांस्कृतिक क्षेत्र अलीकडे विस्तार पावतेे आहे. जुन्या, अनुभवी कलासाधकांचे मार्गदर्शनाखाली नव्या सांस्कृतिक जाणीवांचे शिलेदार विविध संस्थांच्या माध्यमातून नवोपक्रम राबवून जळगावचं काही काळापूर्वी हरविलेलं सांस्कृतिक विश्‍व समृध्द होते आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत याहीवर्षी संगीत-नृत्य-नाटक अशा तिहेरी संगमावर कलासाधकांनी लक्षवेधी कामगिरी केल्याचे दिसते. कलावंताला व्यासपीठ मिळवून देणे, कलेच्या प्रांतात त्यांना प्रतिनिधीत्वाची संधी देणे, अन् त्यांचेतील उपजत प्रतिभेला नव्या पंखांची जोड देऊन आकाशात झेपावण्याची ताकद निर्माण करणे या सार्‍या प्रयत्नांना सामुहिक साथ मिळतेय. कलेचा हा प्रांत आपआपल्या परीने नव्या दमाचे नवे रंगकर्मी कतृत्वाने उजळून टाकताहेत हे सांस्कृतिक विश्‍वासाठी सुचिन्ह आहे.

अगदी अलीकडे वर्षभरात झालेल्या राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्र नाट्यस्पर्धा, बाल नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, राज्यस्तरीय बाल नाट्यस्पर्धा, समरगीत स्पर्धा, संस्कृत नाटिका, नाट्यपदाचे सादरीकरण, पोवाडा स्पर्धा, ढोल पथक, पथनाट्य, भजन स्पर्धा, रंगभरण, एरोबिक्स, चित्रप्रदर्शने, वेषभूषा स्पर्धा, शाहीरी परिषद, नाट्यछटा, कथा अभिवाचन, भुलाबाईची गाणी, मंगळागौर गाणी, काव्यानुभूती, पुरुषोत्तम करंडक, आर्केस्ट्रा, विडंबन नाट्य, डान्स रिअ‍ॅलिटी शो, संगीत नाट्यप्रवेश, बहुभाषिक रंगभूमी, गीत रामायण, नाट्य शिबिरे, गझल सादरीकरण, शास्त्रीय नृत्याविष्कार, दिर्घांक, एकपात्री प्रयोग यांचे प्रभावी सादरीकरण करुन अनेक ज्ञात अज्ञात कलावंतांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन वर्षभरात घडवून रसिकांना तृप्त केले आहे.

कलेच्या क्षितिजावर तेजाने तळपणार्‍या विविध संस्थांनी हा सांस्कृतिक कलायज्ञ धगधगता ठेवला यात प्रामुख्याने खान्देश नाट्य प्रतिष्ठान, संस्कार भारती, परिवर्तन संस्था, विवेकानंद प्रतिष्ठान, केशव स्मृति संस्था, जननायक थिएटर, स्वरवेध फाउंडेशन, मु.जे. महाविद्यालय, दिशा बहुउद्देशीय संस्था, माहेश्‍वरी महिला मंडळ, जैन चारिटीज, जहागीरदार प्रतिष्ठान, जळगाव पिपल्स बँक, चांदोरकर प्रतिष्ठान, कामगार कल्याण केंद्र, सांस्कृतिक संचालनालय, बेंडाळे महाविद्यालय, पायल संगीत नृत्यालय, अनुभूती शाळा, नेहरु युवा केंद्र, शिक्षण प्रसारक मंडळ, के.सी.ई., ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, ब्राह्मण सभा, रोटरी ईस्ट- वेस्ट- मिडटाऊन, जेसिस परिवार, ओजस्विनी, ललित कला महाविद्यालय, व.वा. वाचनालय, जिल्हा महिला असोसिएशन, स्व. प्रा. श्रीरंगराजे स्मृती प्रतिष्ठान, कथ्थक कला केंद्र, मेलडी सुपर हिटस्, स्वरगंध, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वराश्रय संस्था, भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई मेमोरियल ट्रस्ट आदी संस्थांचे मौलिक योगदान आहे.

नव्या सांस्कृतिक जगाचा वेध घेत, कलेच्या विविध प्रांतात नवे आयाम घेऊन कलाविष्कार सादर करणार्‍या ह्या सार्‍या संस्था, त्यांचे व्यवस्थापन, सहभागी कलासाधक यांनी संयुक्तपणे चालविलेली ही सांस्कृतिक चळवळ अशीच वृध्दींगत राहो हीच सदिच्छा…!

            

 संजय निकुंभ
मो 7304155355