जळगावच्या आरएलसह तीन कंपन्यांविरोधात गुन्हा

Loan scam in SBI: Case against three big companies of Jalgaon नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियात 352 कोटींपेक्षा जास्त पैशांचा कर्ज घोटाळा केल्याप्रकरणी जळगावातील तीन कंपन्यांविरुद्ध सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एसबीआयने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीनुसार, राजमल लखीचंद ज्वेलर्समुळे बँकेचा 206.73 कोटी, आरएल गोल्डमुळे 69.19 कोटी आणि मानराज ज्वेलर्समुळे 76.57 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
एफआयआरमध्ये एजन्सीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., आरएल गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स यांचे नाव घेतले आहे. या कंपन्यांचे प्रवर्तक-संचालक-हमीदार ईश्वरलाल शंकरलाल जैन ललवानी, मनीष ईश्वरलाल जैन ललवानी, पुषादेवी ईश्वरलाल जैन ललवानी आणि नीतिका मनीष जैन ललवानी यांना आरोपी करण्यात आले आहे.

आरएलच्या माध्यमातून व्यवसाय हस्तांतरीत
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., आरएल गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स या कंपन्यांपैकी सर्वाधिक कर्जदार कंपनी राजमल लखीचंदमध्ये उर्वरित तीन कंपन्यांनी आपला व्यवसाय हस्तांतरीत केला. चारही कंपन्यांची खरेदी-विक्री प्रामुख्याने राजमल लखीचंद यांच्या माध्यमातून मार्गी लावली, असा आरोप एसबीआयने केला आहे. एफआयआर दाखल केलेल्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये राजमल लखीचंद प्रा.लि.कडून खरेदी केल्याबद्दल पेमेंट केल्याचे दिसते, असेही एसबीआयने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मोठ्या कर्जाची सुरक्षा हमी धोक्यात
‘कर्जदार आणि सहयोगींनी खोटी किंवा फुगलेली आर्थिक माहिती सादर करून फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीचा साठा चुकीचा दाखविला, असे करून कंपन्यांनी बँकेच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केला,’ असा आरोपही एसबीआयकडून करण्यात आला आहे. ‘प्रवर्तक, जामीनदार बँकेची परवानगी न घेता गहाण ठेवलेल्या मालमत्ता विकण्याच्या मर्यादेपर्यंत गेले आहेत. त्यामुळे आधीच घेतलेल्या मोठ्या कर्जाची सुरक्षा हमी धोक्यात आली. त्याचा गंभीर फटका बँकेच्या कर्जवसुलीला बसला,’ असे एसबीआयने तक्रारीत म्हटले आहे. ज्या उद्देशाने बँकेने कर्ज दिले होते, त्यासाठी त्याचा वापर न करता इतरत्र वापर करण्यात आल्याचा आरोपही बँकेने केला आहे.