जळगाव । येथील औद्योगिक वसाहतमध्ये एफ-३५ येथे असणार्या गीतांजली केमिकलमध्ये रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात पाच पेक्षा जास्त गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार बॉयलर फुटल्यामुळे हा स्फोट झाला असून यानंतर कंपनीला भीषण आग लागली. हा स्फोट इतका तीव्र होता की संपूर्ण औद्योगिक वसाहत परिसराला हादरा बसला. दरम्यान, स्फोटाची तीव्रता खूप असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनीचा बहुतेक भाग जळून खाक झाला. संतप्त कामगार आणि परिसरातील नागरिकांनी कंपनीवर दगडफेक करण्याचा प्रयत्नदेखील केला.
याआधीही झालेत अपघात
औद्योगिक वसाहतीतील गीतांजली केमीकल कंपनीत आधीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अलीकडेच म्हणजे गेल्या २७ ऑक्टोबर रोजी काम करणार्या दोघांच्या अंगावर निर्मिती विभागात लूप रिअॅक्टरमधील गॅस पाईप फाटून रसायन पडले होते व ते यात जखमी झाले होते.यातील एकाचा २८ ऑकटोबर रोजी मृत्यू झाला होता तर दुसर्या मजुराचा २ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यात सुनिल चिंतामण चौधरी (वय-२७ , रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) व प्रकाश बळीराम तिळवणकर (५० ) यांना प्राण गमवावे लागले होते. कंपनी प्रशासनाने दोन्ही मृत मजुरांच्या नातेवाईकांना नियमानुसार भरपाई व मदत दिली जाणार आल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. तथापि, व्यवस्थापनाने निष्काळजीपणात सुधारणा न केल्यामुळे पुन्हा भीषण दुर्घटना घडली आहे.
औद्योगिक सुरक्षा ऐरणीवर
जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये अधूनमधून अनेक दुर्घटना घडत असतात. मात्र संबंधीतांवर कधीही कठोर कारवाई होत नाही. यातच गीतांजली केमिकल्समध्ये आधीही अनेक अपघात घडले आहेत. केमिकल्स कंपनीत खूप काटेकोर काळजी घेण्याची आवश्यकता असते. मात्र असे न झाल्यामुळे हा भीषण अपघात घडला असून औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.