जळगाव । शहरातील श्रद्धा कॉलनीत राहणार्या २६ वर्षीय तरूणाने आईच्या निधनानंतर तो खचल्याने त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बोलेले जात आहे. प्रशांत विलास होले (वय-26) असे या तरूणाचे नाव असून तो पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला होता. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. दरम्यान, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक शनिवारी रात्री पुणे येथून जळगावकडे रवाना झाले. रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मयत प्रशांतचे वडील विलास होले हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले असून त्यात प्रशांत हा मोठा होता. त्याचे जळगावात महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. तो गेल्या 4 वर्षांपासून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाला होता. त्याने दोन वर्षांपूर्वी पुण्यात रावेत येथील एस.बी.पाटील रोडवरील तुळजा भवानी हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला होता. तर त्याचे एक वर्षापूर्वीच फैजपूर येथे लग्न झाले होते. पुण्यात तो पत्नी सोबत राहत होता. त्याच्या पत्नीचे माहेर हे परळी वैजनाथ येथील असून ती प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. त्यामुळे प्रशांत घरात एकटाच होता. त्याने शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास फॅनला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांतने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. त्यात काय लिहिले आहे? ही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, नोकरीत बदल करण्याबाबत वडिलांना भेटून चर्चा करण्यासाठी तो शनिवारी जळगावात येणार होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र, त्यापूर्वीच त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.