जळगाव : मोबाईल क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगून महाबळ भागातील प्रौढाची एक लाख 16 हजार 428 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी रात्री राहुल अग्रवाल नामक व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
नरेश भगवान गाजरे (55, महाबळ) हे आपल्या पत्नी व मुलगा लोकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. खाजगी वॉटर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नरेश गाजरे आणि त्यांचा मुलगा लोकेश हे घरी असताना, नरेश यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यात ‘तुमच्या सीम कार्डचे केवायसी बाकी असल्याने 24 तासाच्या आत कागदपत्र जमा करावे, असा मजकूर टाकून एका नंबरवर कॉल करण्याचे सांगण्यात आले.
अॅप डाऊनलोड करताच लांबवली रक्कम
नरेश गाजरे यांनी दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर समोरील व्यक्तीत हिंदीत राहुल अग्रवाल व्होडाफोन केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. नंबर सुरू ठेवण्यासाठी 10 रुपयांचा रीचार्ज करण्यास सांगून केवायसी अपडेट करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार नरेश यांचा साधा मोबाईल असल्याने त्यांनी मुलगा लोकेशला सांगितले. लोकेशने समोरील व्यक्तीच्या दिलेल्या माहितीप्रमाणे ‘यु मोबाईल अॅप’ डाऊनलोड केले आणि दिलेल्या अॅपमध्ये डेबिट कार्डची माहिती भरली. त्यावरून लोकेशने 10 रुपयांचा रीचार्ज केला. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला आणि सांगितले की, तुम्हाला नंबर व्हेरीफाय करण्यासाठी ‘अॅनीडेक्स, ऑटोमेटिक एसएमएस सेंड टू पीसी आणि केवायसी क्वीक डॉक्युमेंट हे तीन अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार लोकेशने सांगितलेली तीनही अॅप डाऊनलोड करून दोघांच्या बँकेचे डिटेल्स भरले. डिटेल भरल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दोघांच्या बँक अकाउंटमधून अनुक्रमे लोकेशनच्या खात्यातून 68 हजार 234 तर नरेश गाजरे यांच्या खात्यातून 48 हजार 184 रुपये असे एकूण दोघांचे एकूण एक लाख 16 हजार 428 रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दोघांनी तातडीने बँकेत धाव घेऊन दोन्ही अकाउंट बंद केलेत. यासंदर्भात नरेश गाजरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता राहुल अग्रवाल नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.