जळगावच्या विकासकामात हेतूतः अडथळा

0

मुंबई। दोन वर्षापासून मंजूर 25 कोटींच्या आमदार निधीच्या विकासकामाला जळगाव मनपाच्या सदस्यांकडून अडवणूक होत असल्याचा वाद विधानसभेत पोहोचला. आमदार सुरेश भोळे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या कामांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले जात नसल्याने विकासकामे खोळंबली असल्याचे भोळे यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

एका सदस्याची धमकी

या मुद्द्याला दुजोरा देत आमदार एकनाथराव खडसे यांनी नागरी क्षेत्रात ना हरकत नसल्यावर विकासकामे कशी करायची? असा सवाल केला. यामुळे जळगाव मनपावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या निधीच्या खर्चाबाबत अटी शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली. 30 दिवसाच्या आत एनओसी दिली नाही तर आपोआप ती दिली असा निर्णय मागे करण्यात आला होता, अशी माहितीही खडसे यांनी यावेळी दिली.

कारवाईचे आश्‍वासन
निधी खर्च करू दिला जाणार नाही अशी उघड धमकी जळगाव मनपातील एक सदस्य देत असल्याची माहिती देत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी खडसे यांनी केली. हा प्रकार म्हणजे विधानमंडळाला आव्हान असल्याचे सांगत खुलासा करावा अशी मागणी खडसेंनी केली. याला आमदार संजय सावकारे यांनीही दुजोरा दिला. यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन ना. रणजित पाटील यांनी दिले.