जळगाव : शहरातील सम्राट कॉलनी भागातील 18 वर्षीय तरुणावर जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.लखन अशोक झाल्टे (18, रा.सम्राट कॉलनी, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला
लखन झाल्टे हा आई-वडील व बहिणीसोबत वास्तव्याला असून तो फुले मार्केटमधील मनोहर कापड दुकानात कामाला आहे. रविवार, 20 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास लखन झाल्टे हा दुध घेण्यासाठी गेला असता रोहित लालचंद चव्हाण (ईच्छादेवी मंदिराच्या मागे, तांबापूरा, जळगाव) हा तिथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून लखन याच्यावर धारदार वस्तूने मानेवर, पाठीवर, हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. जखमी अवस्थेत लखन याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी सोमवार, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता लखन झाल्टेची आई हिरा झाल्टे यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संयीत आरोपी रोहित लालचंद चव्हाण (ईच्छादेवी मंदिराच्या मागे, तांबापूरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार प्रदीप पाटील करीत आहे.