जळगाव : जळगावात तरुणावर चॉपरने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील दोघा आरोपींना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. विक्की भगवान कोळी (24, रा.कांचन नगर) व दीपक संजय साळुंखे (24, रा. बारा खोल्या प्रजापत नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर एका अल्पवयीनासह ताब्यात घेण्यात आले आहे. संशयीतांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच. 19 डी.एन.5243) व चॉपर जप्त करण्यात आला.
तरुणावर केला होता हल्ला
शहरातील सिंधी कॉलनी येथील चेतनदास मेहता हॉस्पिटलजवळ भोलासिंग जगदीशसिंग बावरी (25, रा.शिकलकर नगर, शिरसोला नाका, तांबापूरा) या तरुणावर 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला होता. य ाप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाज, पोलीस नाईक प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, अविनाश देवरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर संशयीत आरोपींना आसोदा रोडवरील जैनाबादजवळून अटक केली. तिघांना अटक करून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.