जळगाव । देशाच्या विकासात लहान उद्योगांचा महत्वपूर्ण वाटा आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून जळगावचे नाव देशभर गेले असून या उद्योगाने देशाला नवी दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. भारतीय रिझर्व बँक मुंबईच्या वित्तीय समावेशन विभागातर्फे खान्देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी जिल्हा नियोजन भवनात चर्चासत्राचे (टाऊन हॉल मिटिंग) आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रास मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी रिझर्व बँक महाव्यवस्थापक एम.सी.जाधव, सहसंचालक पी.पी.देशमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच.के.नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, सहसंचालक शैलेंद्र सिंग, सीजीईएमएसई सहव्यवस्थापक अभिषेक कुमार राय, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक दामले आदि उपस्थित होते.
अडचणी सोडवाव्या
भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव म्हणाले की, आतापर्यंत रिझर्व बँक जेथपर्यंत पोहोचली नाही तेथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 40 टक्के वाटा हा लहान उद्योगांचा असल्याने रिझर्व बँकेने या क्षेत्राला मदतीचे धोरण आखले असून याबाबत रिझर्व बँकेचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लहान उद्योगातून सध्या 25 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. तर अशा उद्योगांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोल्ड क्लस्टरला पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने येथील उद्योगांनी त्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्लॅस्टीक पार्क व्हावे
कोणत्याही विकासात बँक महत्वाचा घटक असल्याने बँकांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली पाहिजे असे सांगून उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख म्हणाले की, प्लॅस्टीक पार्कसाठी जळगाव जिल्हयातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. तसेच केळी प्रक्रिया उद्योग करणार्या उद्योजकांनी एकत्र येऊन जिल्हयात तसे क्लस्टर तयार करावे यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
विमानसेवा सुरु होणार
रिझर्व बँक ऑफ इंडियाने लहान उद्योगांना उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात पूरक उद्योगांना लागणारा कच्चा माल मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. जळगाव, भुसावळ सारखे रेल्वे जंक्शन असून डिसेंबर अखेर विमानसेवाही सुरु होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन उद्योजकांनी आपले उद्योग जिल्हयात सुरु केले पाहिजे असे सांगून उद्योजकांना व कर्जदारांना बँकांकडून मिळणार्या वागणूकीबाबत मात्र जिल्हाधिकारी यांनी खंत व्यक्त केली.