जळगावसह रावेर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दोन तासात आठ टक्के मतदान

0

अनेक ठिकाणी लागल्या रांगा ; काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची तक्रार

जळगाव/भुसावळ- राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्प्यात मंगळवार, 23 रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ दरम्यान पहिल्या दोन तासात सरासरी दोन ठिकाणी सुमारे आठ टक्के मतदान झाले. सकाळी सुरुवातीला मतदारांची गर्दी नसलीतरी टप्प्याटप्प्याने ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र होते तर काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारीही आल्या. प्रशासनाने लागलीच दखल घेत नादुरुस्त ईव्हीएम बदलवल्याचे सांगण्यात आले.

उमेदवारांनीही केले मतदान
जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार व आमदार उन्मेश पाटील यांनी सहपरीवार मूळगावी दरेगाव, ता.चाळीसगाव येथे हक्क बजावला तर रावेर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनी विवरा, ता.रावेर येथे कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला तर भाजपा-सेना महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे व परीवारातील सदस्यांनी कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे हक्क बजावला. यावेळी मंदा खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, शारदा खडसे व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या दोन तासात सरासरी 8 टक्के मतदान
सकाळी सात ते नऊ दरम्यान जळगाव मतदारसंघासाठी 7.18 टक्के तर रावेर मतदारसंघासाठी 8.7 टक्के मतदान झाले.

दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा
यंदा दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विशेष सुविधा दिल्या आहेत त्यात मतदान केंद्रावर व्हिलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक मतदान केंद्र तयार करण्यात आले असून तेथे मतदारांचे औक्षण करून त्यांचा उत्साह वाढवला जात आहे.