जळगावातील तरुणाची हत्या : आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

जळगाव : वाळू व्यावसायाच्या वादातून जळगावातील वाळू व्यावसायीक भावेश पाटील या तरुणाची निर्घूण हत्या केल्याप्रकरणी पसार असलेल्या दोघा आरोपींना पुण्यातील तळेगाव रोड परीसरातून गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मनीष नरेंद्र पाटील (20, रा.अहमदाबादवाडा आव्हाणे, जळगाव) व भूषण रघुनाथ सपकाळे (32, आंबेडकर पुतळयामागे, खेडी खुर्द, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चॉपरने हल्ला करीत काढला पळ
तीन दिवसांपूर्वीच जळगावच्या निवृत्ती नगर भागात वाळू व्यावसायीक भावेश उत्तम पाटील (32, रा.आव्हाणे , ह.मु.स्वामी समर्थ केंद्राजवळ निवृत्तीनगर, जळगाव) याचा पूर्व वैमनस्यातुन निवृत्ती नगर भागातील बंधन बँकसमोर चॉपरचे तब्बल 24 वार करीत दोघा आरोपींनी पळ काढला होता.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, संतोष मायकल, मुरलीधर बारी यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संशयीत पुणे शहरातील पुणे-तळेगाव रोडने जात असताना गुरुवारी सकाळी 7.30 वाजता दोन्ही आरोपींना अटक करून अधिक कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.