जळगावातील तरुणीचा झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने मृत्यू

A noose fell on her neck while playing zhoka: Death of a young woman in Jalgaon जळगाव : जळगावच्या महाबळ परीसरात झुल्याची दोरी गळ्यात अडकल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विधी स्वप्निल पाटील (१८, रा.महाबळ, जळगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.

झोका खेळताना फास आवळला
विधी ही तरुणी आपल्या आई तेजस्वीनी, वडील स्वप्निल पाटील आणि आजोबा यांच्यासह वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण करीत होती. मंगळवारी दुपारी चार वाजता महाबळमधील राहत्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झुल्यावर बसलेली होती. त्यावेळी घरात कुणीच नव्हते, झुल्याचा झोका घेत असतांना अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला. त्यावेळी घरात कुणीही नसल्याचे तिचा गळफास लागल्याने मृत्यू झाला.

आजोबांच्या लक्षात आली घटना
दरम्यान, विधीच्या आजोबांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला परंतू कॉल उचलत नसल्याचे पाहून ते घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झुल्याचा गळफास लागल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. विधी ही एकुलती एक मुलगी असल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.