जळगावातील दरोडा प्रकरण : विदगावच्या सात आरोपींना अटक

Jalgaon vehicle dealer DD Bachhao’s robbery solved : Crime branch arrests seven accused जळगाव : जळगावचे वाहन व्यावसायीक डी.डी.बच्छाव यांच्याकडे नकली पिस्तुलाच्या आधारे दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अलीकडेच घडली होती. या गुन्ह्याची उकल करण्यात जळगाव गुन्हे शाखेला यश आले असून विदगाव गावातील सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पत्रकार परीषदेत गुन्ह्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. वर्षभरापूर्वी संशयीत अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (३१) हा शोरूममध्ये कार पाहण्यासाठी आल्यानंतर त्याने दरोड्याचा प्लॅन आखल्याची बाबही समोर आली आहे.

१४ रोजी दरोड्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील नामांकित वाहन व्यावसायीक डी.डी.बच्छाव हे परिवारासह रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात राहतात. बच्छाव सर लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेले असतानाच १४ नोव्हेंबर रोजी मोठा मुलगा किरण बच्छाव त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला. नोकर बाहेर पडताच ७ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले तर दुसर्‍याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. पत्नीचा आवाज ऐकून घरात फ्रेश होत असलेले किरण बच्छावदेखील पुढे आले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी किरण बच्छाव यांच्यावर चाकूने वार केले परंतु ते थोडक्यात चुकले. किरण बच्छाव यांच्या पत्नीने खिडकीतून जोरात आवाज दिला असता शेजारील महिलेने सर्व दृश्य पाहिले व आरडाओरडा केली. बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी एक आयफोन हिसकावला आणि मागील बाजूने पळ काढला.

जिल्हापेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
दरोड्याचा प्रयत्न झाल्यानंतर किरण बच्छाव यांच्या फिर्यादवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचे विश्लेषण करीत या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे विदगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न केले. शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या

या आरोपींना अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी यश सुभाष कोळी (२१), अर्जून ईश्वर कोळी (३०), दर्शन भगवान सोनवणे (२९), करण गणेश सोनवणे (१८), अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (३१), सचिन रतन सोनवणे (२७) आणि सागर दिलीप कोळी (२८, सर्व रा.दाजीबा चौक, विदगाव, ता.जि.जळगाव) यांना अटक करण्यात आली. सर्व संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरोडा घालणारे संशयीत हे सर्वच सराईत गुन्हेगार नसून सात जणांपैकी तिघांवर काही गुन्हे दाखल आहेत. इतर सर्व नवखे आहेत. गुन्ह्याच्या अगोदर रेकी करण्यासाठी देखील ते सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे पायी किंवा रिक्षाने त्याठिकाणी आले होते. गुन्ह्याचा आणखी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, संदीप सावळे, किरण चौधरी, लोकेश माळी तसेच पथक क्रमांक एकमधील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, राजेंद्र पवार, पथक क्रमांक दोनमधील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, हवालदार राजेश मेढे, पोह संजय हिवरकर, पोह लक्ष्मण पाटील, पोकॉ प्रमोद ठाकुर, पथक क्रमांक तीनमधील प्रवीण मांडोळे, नितीन बावीस्कर, प्रीतम पाटील, रवींद्र पाटील, पथक क्रमांक चारमधील पोलीस हवालदार अशरफ शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.