जळगावातील दोघे कुविख्यात आरोपी दोन वर्षांसाठी हद्दपार

The two accused of serious crimes including murder were banished from the district for two years जळगाव : सामाजिक शांततेता अडसर ठरू पाहणार्‍या दोघांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. भूषण उर्फ भासा विजय माळी व सचिन उर्फ टीचकुल कैलास चौधरी (दोन्ही रा.तुकारामवाडी, जळगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयीतांविरोधात खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी, प्राणघातक हल्ला या सारखे गंभीर गुन्हे दाखल होते तर खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी संशयीतांच्या हद्दपारीचे आदेश काढताच एमआयडीसी पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी केली.

दोघांविरोधात गंभीर गुन्हे
भूषण माळी हा टोळी प्रमुख असून सचिन हा त्याचा साथीदार आहे. या दोघांच्या टोळीने शहरात खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे गुन्हे केलेले आहेत. भूषण याच्यावर खुनाचे दोन, दरोडा, जबरी चोरी, मारामारी व अवैध शस्त्रे बाळगणे यासारखे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत तर सचिन याच्याविरुध्द खुनाचा एक, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे सात गुन्हे दाखल आहेत.

दोन वर्षांसाठी ‘चले जाव’
भूषण माळी, सचिन चौधरी व त्याच्या सहकार्‍यांनी 18 मार्च रोजी शासकीय रुग्णालयाच्या आवारात सरिंज विजय ओतारी याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला होता. या गुन्ह्यात दोघे कारागृहात होते. दोन दिवसांपूर्वी सचिन याला न्यायालयाने जामीन मंजूर केला तर मंगळवारी भूषणची जामिनावर कारागृहातून सुटका झाली परंतु कारागृहातून बाहेर पडताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे स्वत:च्या अधिकारात भूषण व सचिन या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.

एमआयडीसी पोलिसांनी पाठवला होता प्रस्ताव
सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील व साईनाथ मुंढे यांनी दोघांना बुधवारी हद्दपारीची नोटीस बजावून शहराबाहेर रवाना केले. तत्पूर्वी दोघांना हद्दपार करण्याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता व त्याबाबत मंगळवारी आदेश काढण्यात आले.