जळगाव : पुण्यातील दोघांनी जळगावच्या भंगार व्यावसायीकाला तब्बल 12 लाखांचा गंडा घातला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी फसवणूक करणार्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल जब्बार कादर पटेल (57, रा.गुलाब बाबा कॉलनी, मेहरूण, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्या असून अब्दुल पटेल व त्यांचा भागीदार तानाजी शिंगाडे यांच्यासोबत भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. संशयीत संतोष गुलाब खुडे आणि चंदू जाधव (पुर्ण नाव माहित नाही, दोन्ही रा. कासेवाडी, भवानीपेठ, स्वारगेट, पुणे) यांनी अब्दुल पटेल व तानाजी शिंगाडे यांच्याकडून 11 लाख 90 हजार रुपये घेऊन भंगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यांनी भंगार न देता त्यांची फसवणूक केली. या संदर्भात अब्दुल पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने शनिवारी दुपारी दोन वाजता संशयीत आरोपी संतोष गुलाब खुडे व चंदू जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.