जळगावातील भाऊ-बहिण एरंडोलजवळील अपघातात जागीच ठार

भरधाव ट्रालाची इर्टीगाला धडक : पाच जण जखमी ; एकाची प्रकृती गंभीर

भुसावळ/एरंडोल : देवदर्शनाहून परतणार्‍या जळगावातील भाविकांच्या वाहनाला एरंडोल शहराजवळील हॉटेल कृष्णाजवळ अपघात झाल्याने भावासह बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शनिवार, 12 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या महामार्गावरील हॉटेल कृष्णाजवळ घडला. प्रकाश बागरेचा (70) व कमलाबाई जैन (65, नूतन मराठा विद्यालयाजवळ, जळगाव) अशी मयतांची नावे आहेत.

देवदर्शनाहून परतताना अपघात
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, जळगावातील बांधकाम व्यावसायीक नरेंद्र जैन व त्यांच्या परीवारातील सदस्य धुळे शहराजवळील बोरकुंड येथे दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात जळगावकडे इर्टीगा (एम.एच.19 सी.व्ही. 7717) ने निघाले असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल कृष्णाजवळ समोरून भरधाव वेगाने आलेला कंटेनर (एम.एच.46 बी.बी.8532) ने समोरून जोरदार धडक दिल्याने या अपघातात प्रकाश बागरेचा (70) व कमलाबाई जैन (65, नूतन मराठा विद्यालयाजवळ, जळगाव) या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला तर कार चालक व जळगावचे बांधकाम व्यावसायीक नरेंद्र जैन (50) यांच्यासह त्यांच्या पत्नी योगीता नरेंद्र जैन (40) व मुलगा नमन व मुलगी लभोनी हे जखमी झाल्याने त्यांच्या स्थानिक कल्पना हॉस्पीटलमध्ये तर विजय शांतीलाल जैन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. दरम्यान, मयत कमलाबाई जैन या अपघातातील जखमी तथा चालक बांधकाम व्यावसायीक यांच्या आई तर मयत प्रकाश बागरेचा हे मामा होत.

कंटेनर चालकास अटक
अपघाताची माहिती कळताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले असून अपघाताला कारणीभूत असलेला कंटेनर पोलिसांना जप्त करीत पोलिस ठाण्यात आणला आहे.